Join us  

Gautam Adani: गौतम अदानींनी एका दिवसात बाजी पलटली, पुन्हा १०० अब्ज डॉलर्स क्लबमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 10:23 AM

Gautam Adani News : जगभरातील शेअर बाजारात बुधवारी तेजी दिसून आली. यामुळे जगातील टॉप २० श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ झाली. गौतम अदानी यांनीही जोरदार पुनरागमन केलं आहे.

Gautam Adani News : जगभरातील शेअर बाजारात बुधवारी तेजी दिसून आली. यामुळे जगातील टॉप २० श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ झाली. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी २४.९ अब्ज डॉलरची घसरण झाली आणि ते १०० अब्ज डॉलरच्या क्लबमधून बाहेर पडले होते. पण बुधवारी अदानी समूहाचे बहुतांश शेअर्स वधारले. यामुळे अदानी यांच्या संपत्तीत ५.५९ अब्ज डॉलरची वाढ झाली. ते १०३ अब्ज डॉलरसह जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांच्या संपत्तीत यंदा १८.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आशियातील श्रीमंतांच्या यादीत ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत बुधवारी २.२० अब्ज डॉलरची वाढ झाली. ते १०९ अब्ज डॉलरसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत. 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट २१२ अब्ज डॉलरसंपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. बुधवारी त्यांच्या संपत्तीत ४.४६ अब्ज डॉलरची वाढ झाली. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस २०४ अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या आणि इलॉन मस्क २०१ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकेरबर्ग १७६ अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहेत. बुधवारी त्यांच्या संपत्तीत ६.२४ अब्ज डॉलरची वाढ झाली. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ४७.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. लॅरी पेज १५५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. 

टॉप १० मध्ये कोण? 

जगातील सर्वात मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स १५४ अब्ज डॉलरसह या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. स्टीव्ह बाल्मर (१४७ अब्ज डॉलर) सातव्या, सर्गेब्रिन (१४६ अब्ज डॉलर) आठव्या, लॅरी एलिसन (१३७ अब्ज डॉलर) नवव्या आणि वॉरेन बफे (१३५ अब्ज डॉलर) दहाव्या क्रमांकावर आहेत. मायकेल डेल १०९ अब्ज डॉलरसह १२ व्या आणि अमेरिकन एआय चिप निर्माता एनव्हिडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग १०७ अब्ज डॉलरसह १३ व्या स्थानावर आहेत. हुआंग यांच्या संपत्तीत या वर्षी ६३.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजारव्यवसाय