Adani Group New IPO: हिंडेनबर्ग संस्थेने रिपोर्ट प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला प्रचंड तोटा सहन करावा लागला होता. मात्र, यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत अदानी समूह या तडाख्यातून बहुतांशरित्या सावरल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अदानी समूहाला एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे. यातच आता अदानी समूहातील आणखी एक कंपनी शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. लवकरच अदानी समूहातील या कंपनीचा आयपीओ येणार असल्याचे सांगितले जात आहे.
आता अदानी समूह स्टॉक मार्केटमध्ये आणखी एक कंपनी सूचीबद्ध करून पैसे उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे, ज्यासाठी कंपनी आयपीओ आणू शकते. अदानी समूह त्यांच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी अदानी कॅपिटलचा IPO आणू शकते. या माध्यमातून कंपनी बाजारातून अनेक कोटी रुपये जमवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासह, समूह आपल्या इतर प्रमुख कंपन्यांसाठी पैसे उभारू शकते. अदानी कॅपिटल सध्या प्रामुख्याने एमएसएमई आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करत आहे.
अदानी समूहाचा अदानी कॅपिटलमध्ये ९० टक्के हिस्सा
काही खासगी इक्विटी फंडांनी या कंपनीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. अदानी कॅपिटलने या कराराची जबाबदारी गुंतवणूक बँक एव्हेंडस कॅपिटलला दिली आहे. अॅव्हेंडस कॅपिटलने या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिला असला, तरी अशा आयपीओच्या योजनेला अदानी समूहानेही दुजोरा दिला आहे. अदानी समूहाचा अदानी कॅपिटलमध्ये ९० टक्के हिस्सा आहे. तर उर्वरित १० टक्के व्यवस्थापनाकडे आहे.
दरम्यान, गत आर्थिक वर्षात कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३,९७७ कोटी रुपये होती.अदानी समूह केवळ अदानी कॅपिटलसाठीच नव्हे तर अदानी एंटरप्रायझेससाठी १२,५०० कोटी रुपये आणि अदानी ट्रान्समिशनसाठी ८,५०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे सांगितले जात आहे.