कामकाजाच्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात काहीशी तेजी दिसून येत आहे. पण अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिकेतून येणाऱ्या बातम्यांनुसार अदानी एंटरप्रायझेसला ७ फेब्रुवारीपूर्वी डाऊ जोन्स इंडेक्समधून वगळलं जाणार आहे. क्रिसिलने रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, संशोधन अहवाल पाहता, कोणतीही प्रतिकूल नियामक किंवा सरकारी कारवाई, कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित उदयोन्मुख समस्यांवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. तसेच, शेअर्सच्या किमतीत सतत घसरण झाल्यामुळे बँका किंवा भांडवली बाजारातून संसाधनं उभारण्याच्या क्षमतेत होणाऱ्या परिणामांवरही लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये ५ ते २० टक्क्यांची घसरण झाली.
सकाळच्या सत्रात अदानी एंटरप्राईझेसच्या शेअर्समध्ये २५.७५ टक्क्यांची घसरण झाली होती. सुरूवातीला शेअर्समध्ये ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आणि शेअर्सनं ५२ आठवड्यांचा निचांकी स्तर गाठला. कंपनीच्या शेअर्सनं १०१७.४५ रुपयांचा ५२ आठवड्यांचा निचांकी स्तर गाठला होता. त्यानंतर शेअर्सची किंमती काहीशी सावरली आणि कामकाजादरम्यान ११७०.१५ रुपयांवर पोहोचली. अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
टॉप २० मधूनही बाहेर
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर 'अदानी ग्रूप'च्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्सुनामीच आली आहे. गौतम अदानींचं साम्राज्याला या अहवालामुळे जबर धक्का बसला आहे. दररोज अदानींच्या संपत्तीत मोठी घट होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टॉप-२० मधूनही बाहेर फेकले गेले आहेत.
Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये झालेल्या पडझडीमुळे ते आता श्रीमंतांच्या यादीत थेट २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता ६१.३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे आणि गेल्या २४ तासात त्यांना १०.७ अब्ज डॉलरचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेअर्समधील घट पाहता गौतम अदानी आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गपेक्षाही मागे गेले आहेत. झुकरबर्गची एकूण संपत्ती ६९.८ अब्ज डॉलर इतकी आहे आणि तो श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहे.