Adani Group, LIC of India, Share Market: शेअर बाजारात नेहमी दिमाखात ट्रेडिंग करणाऱ्या अदानी समूहाच्या कंपन्यांची अवस्था आज खूप वाईट झाली. परिणामी LIC चेही मोठे नुकसान झाले. एलआयसीने अदानी समूहाच्या ७ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीमुळे सरकारी विमा कंपनीचे सुमारे १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गुरुवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीमुळे यात गुंतवणूक करणाऱ्या सरकारी विमा कंपनी LIC ला सुमारे १२,००० कोटी रुपयांचा फटका बसला. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंजने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण झाली. पण अदानी ग्रुपने मात्र स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळले आहेत.
अदानी समूहाच्या कोणत्या कंपन्यांमध्ये LIC ची गुंतवणूक आहे?
सप्टेंबर 2024च्या शेअरहोल्डिंगनुसार, LIC ने अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस, एसीसी आणि अंबुजा सिमेंट्स या ७ कंपन्यांमध्ये सरकारी विमा कंपनीची गुंतवणूक आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे LIC च्या शेअर्समध्ये ११,७२८ कोटी रुपयांची घट दिसून आली आहे.
अदानी पोर्ट्सने दिला सर्वात मोठा धक्का
अदानी पोर्ट्सने LIC ला सर्वात मोठा धक्का दिला. या ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर LIC ला सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. तसेच, LIC ला अदानी एंटरप्रायझेसमध्येही अंदाजे ३ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. याशिवाय, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समुळे LIC ला सुमारे १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या तीन मोठ्या नुकसानीसोबतच, अदानी टोटल गॅसमध्ये ८०७ कोटी रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये ७१६.४५ कोटी रुपये, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ५९२ कोटी रुपये आणि एसीसीमध्ये ३८१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अदानी ग्रुपवर आरोप काय?
अमेरिकेने केलेल्या दाव्यात, अदानींचा पुतण्या सागर अदानी आणि इतरांवर २०२० ते २०२४ दरम्यान सौर ऊर्जा कराराचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २५० अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका अंदाजानुसार, यामुळे समूहाला दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. ज्या अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांकडून अदानी समूहाने या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्स उभे केले होते, त्यांच्यापासून हे सर्व लपवण्यात आल्याचा आरोपही अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)