Join us  

Adani Group Stocks: आज अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी उसळी; मार्केट कॅप 10 लाख कोटींच्या पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 3:30 PM

Adani Group Stocks: सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

Adani Group Stocks: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व 10 शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे. यामुळे अदानी समूह कंपन्यांचे मार्केट कॅप (अदानी ग्रुप एम-कॅप) आज 22 मे रोजी एकत्रितपणे 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यासोबतच समूहाच्या अनेक शेअर्समध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे.

आज अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुपारी 12.30 च्या सुमारास अदानी एंटरप्रायझेसचा शेअर रु. 337.00 म्हणजेच 17.23% वाढीसह रु. 2,293.05 वर व्यवहार करताना दिसला.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये आजच्या सुरुवातीच्या ट्रेडपासून जोरदार खरेदी होत आहे. त्यामुळेच अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप 2.60 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

आज अदानी समूहाच्या ज्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली आहे, त्यात अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, एनडीटीव्ही आणि अदानी पॉवर यांचा समावेश आहे. हे पाच शेअर्स आज 5% अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत. याशिवाय अदानी विल्मर (9.99%), अदानी पोर्ट्स (6.67%), आणि अंबुजा सिमेंट (6.18%) सारखे इतर शेअर्सही तेजीने व्यवहार करत आहेत. 

टॅग्स :अदानीगौतम अदानीव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार