Join us

Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:01 IST

Adani Group Stocks: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी ट्रेडिंग सेशनमध्येही अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या घसरणीसह उघडले. बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली.

Adani Group Stocks: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी ट्रेडिंग सेशनमध्येही अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group Stocks) मोठ्या घसरणीसह उघडले. बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली. आजच्या सत्रात सर्वात मोठी घसरण अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये दिसून आली असून तो ७.५३ टक्क्यांनी घसरून १०६० रुपयांवर आला. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सदेखील ५ टक्क्यांपर्यंत घसरणीसह उघडले.

अदानीच्या शेअरमध्ये पुन्हा घसरण

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ७.५३ टक्क्यांनी घसरून १,०६० रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्स ६.८२ टक्क्यांनी घसरून ६५० रुपये, अदानी एंटरप्रायजेस ४.२४ टक्क्यांनी घसरून २,०९० रुपये, अदानी पोर्ट्स ५.३२ टक्क्यांनी घसरून १,०५५ रुपये, अदानी पॉवर ५.२७ टक्क्यांनी घसरून ४५१ रुपयांवर उघडले. अदानी टोटल गॅस ६.१२ टक्क्यांनी घसरून ५६५ रुपयांवर, अदानी विल्मर ४.८६ टक्क्यांनी घसरून २८० रुपयांवर, अंबुजा सिमेंट ०.३० टक्क्यांनी घसरून ४८२ रुपयांवर आणि एसीसी ०.८१ टक्क्यांनी घसरून २००९ रुपयांवर व्यवहार करत होते.

निधी गोळा करणे महाग पडणार!

अदानी समूहातील कंपन्यांच्या दृष्टीकोनाचा आढावा घेताना रेटिंग एजन्सी एस अँड पीनं ( S&P) अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी आरजी २ (AGEL RG2), अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचं रेटिंग बीबीबीवर कायम ठेवलं आहे. पण चेअरमन गौतम अदानी आणि इतर अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप झाल्यानंतर समूहाच्या निधी उभारण्याच्या प्रक्रियेला धक्का बसू शकतो तसंच फंडिंग कॉस्टमध्येही ही वाढ होऊ शकते, असं रेटिंग एजन्सीनं म्हटलंय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानी