Join us

Adani Share Market: सेन्सेक्स वधारला पण अदानींच्या सर्व कंपन्या गडगडल्या; एका मिसाईलने कामाला लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 4:26 PM

पोलंड हल्ल्याची बातमी आली सर्वांना दुसऱ्या महायुद्धाच्या ठिणगीची आठवण झाली. तोवर गुंतवणूकदार सावध झाले होते.

रशियाने पोलंडवर हल्ला चढविल्याच्या वृत्ताने जगभरातील शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली होती. सर्वांना दुसऱ्या महायुद्धाच्या ठिणगीची आठवण झाली होती. परंतू नंतर ते मिसाईल रशियाचे नाही तर युक्रेनचे असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तोवर गुंतवणूकदार सावध झाल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारांवर उमटले होते. 

BSE सेन्सेक्सने 13 महिन्यांत प्रथमच 62,000 अंकांची पातळी गाठली होती. सध्या तो 61,980.72 वर बंद झाला आहे. सेन्सेक्स आता 19 ऑक्टोबर 2021 रोजी गाठलेल्या 62,245 च्या सर्वकालिन उच्चांकापेक्षा फक्त 264 अंकांनी खाली आहे. सेन्सेक्स आज ०.१७ टक्क्यांनी वाढला असला तरी अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स मात्र गडगडले आहेत. 

दुसरीकडे निफ्टीने 18,442 चा उच्चांक गाठला होता. दिवसाच्या अखेरीस सात अंकांनी वाढून 18,410 वर स्थिरावला आहे. बीएसई मिडकॅप 0.7 टक्क्यांनी घसरला तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरला. यातच अदानी समूहाच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव होता. यामुळे अदान ग्रीन 4 टक्क्यांनी घसरला. तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. एसीसी आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये प्रत्येकी १ टक्क्याची घसरण पहायला मिळाली. बीएसई मेटल निर्देशांकत 1.5 टक्क्यांनी घसरण पहायला मिळाली. पॉवर आणि रिअॅल्टी निर्देशांकही प्रत्येकी एक टक्क्यांची पडझड झाली. 

टॅग्स :शेअर बाजारअदानी