अदानी समूहाने त्यांच्या काही कंपन्यांच्या स्वतंत्र ऑडिटसाठी अकाऊंटन्सी फर्म ग्रँट थॉर्नटनला काम दिलं आहे. जेणेकरुन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचे दावे खोडून काढता येतील. अदानींनी कंपनीचे स्टॉक आणि बाँड्समध्ये फेरफार केल्याचा आरोप हिंडनबर्गनं केला आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीत, २४ जानेवारीच्या हिंडेनबर्ग अहवालानंतर ऑफशोअर टॅक्स हेव्हन्सचा अयोग्य वापर आणि स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप असलेल्या अदानी समुहाने स्वतःचा बचाव करण्यासाठी केलेला हा पहिला मोठा प्रयत्न आहे.
१२० अब्ज डॉलरचे नुकसान
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने हे आरोप ठामपणे नाकारले असले तरी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. समूहाच्या सात लीस्टेट सहाय्यक कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या तीन आठवड्यांत मार्केट कॅपमध्ये जवळपास १२० अब्ज डॉलर गमावले आहेत. अदानी समूहाने गेल्या आठवड्यात सांगितले की ते हिंडेनबर्ग अहवालानंतर कायदेशीर अनुपालन, संबंधित पक्ष व्यवहार आणि अंतर्गत नियंत्रण यांच्याशी संबंधित मुद्द्यांचे स्वतंत्र मूल्यांकन करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर प्रथमच ग्रँट थॉर्नटन कंपनीच्या नियुक्तीची माहिती समोर आली आहे.
कशाची चौकशी होणार?
सूत्रांनी सांगितले की, अदानी समूहाच्या काही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यासाठी ग्रँट थॉर्नटन यांना नियुक्त करण्यात आले आहे. कंपनीची नियुक्ती गोपनीय ठेवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहातील संबंधित पक्ष व्यवहार कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकांचे पालन करतात की नाही हे ग्रँट थॉर्नटन पाहतील. ग्रँट थॉर्नटन आणि अदानी समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
रेग्युलेटरवर सातत्यानं वाढतोय दबाव
अदानी समूहाने सोमवारी गुंतवणुकदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कॅश फ्लो आहे, त्यांच्या व्यवसाय योजनांना पूर्णपणे निधी उपलब्ध आहे आणि भागधारकांना उत्कृष्ट परतावा देण्याच्या आमच्या पोर्टफोलिओच्या निरंतर क्षमतेवर विश्वास आहे, असं अदानींकडून सांगण्यात आलं आहे. पण नियामकाकडून दबाव वाढत आहे. भारताच्या बाजार नियामकाने सोमवारी पुष्टी केली की ते हिंडेनबर्गच्या अहवालाचे तसेच अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी आणि नंतर बाजारातील घटनांचे परीक्षण करत आहेत.