Join us  

Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 1:36 PM

बुधवारी कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

Adani News : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू आहेत. मंगळवारीही सकाळच्या तेजीनंतर संध्याकाळी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. दरम्यान, बुधवारी कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या अदानी एनर्जीच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

सेबीच्या कारणे दाखवा नोटीसनंतर घसरण

बाजार नियामक सेबीनं अदानी एनर्जीला नोटीस बजावत सप्टेंबर तिमाहीत शेअरहोल्डर्सचं चुकीचे वर्गीकरण झाल्याचे म्हटलं आहे. बुधवारी अदानी एनर्जीचा शेअर ४ टक्क्यांनी घसरून ९७५ रुपयांवर आला. 'चालू तिमाहीत काही कंपन्यांच्या शेअरहोल्डिंगचे चुकीच्या पद्धतीनं पब्लिक शेअरहोल्डिंग म्हणून वर्गीकरण करण्यात आलं आणि त्याचे परिणाम काय होतील, असा आरोप करणारी कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. कंपनी वेळोवेळी लागू होणारी माहिती, अभिप्राय, दस्तऐवज आणि/किंवा स्पष्टीकरण देऊन नियामक आणि वैधानिक प्राधिकरणांना प्रतिसाद देईल,' असं कंपनीनं स्पष्ट केलं.

मार्चमध्येही मिळालेली नोटीस

कंपनीने पुढे सांगितलं की, मार्च तिमाहीत सेबीकडून मागील कालावधीच्या संदर्भात आपल्या एका माजी वैधानिक ऑडिटरकडून पीअर रिव्ह्यू प्रमाणपत्रांच्या वैधतेशी संबंधित आणखी एक एससीएन प्राप्त झाला आहे. सेबीच्या त्या प्रश्नांना व्यवस्थापनानं उत्तरं दिली आहेत, असंही कंपनीनं म्हटलं. यापूर्वी जूनमध्ये अदानी समूहाच्या सीएफओनं सेबीनं आपल्या अर्धा डझन सूचीबद्ध कंपन्यांना पाठवलेल्या नोटिसा 'प्रक्रियात्मक' असल्याचं म्हटलं होतं आणि समूह नियमांचं पालन करत असल्याचंही सांगितलं होतं.

वर्षभरात ३३% रिटर्न

अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स गेल्या महिन्याभरात ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर सहा महिन्यांत ते ६ टक्क्यांनी घसरलेत. वर्षभरात शेअरहोल्डर्सना ३३ टक्के नफा झालाय. या शेअरचा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर १,३४८ रुपये तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६८६ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सेबीअदानीगौतम अदानीशेअर बाजार