Join us  

Adaniच्या 'या' दिग्गज कंपनीचा शेअर सुस्साट... ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; गुंतवणूकदार तुटून पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 12:01 PM

तिमाही निकालानंतर अदानी समूहाच्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच शुक्रवारी मोठी वाढ झाली.

तिमाही निकालानंतर अदानी समूहाची (Adani Group) दिग्गज कंपनी अदानी पोर्ट्सच्या (Adani Ports) शेअर्समध्ये आज म्हणजेच शुक्रवारी 5 टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीनंतर अदानी पोर्ट्सच्या शेअर्सची किंमत 1279.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. डिसेंबर तिमाही कंपनीसाठी उत्कृष्ट ठरली आहे. 

निव्वळ नफ्यात 65 टक्क्यांची वाढ  

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोननं डिसेंबर तिमाही आणि पहिल्या ९ महिन्यांचे निकाल काल म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान कंपनीचा एकूण निव्वळ नफा 2208 कोटी रुपये झाला आहे. वार्षिक निव्वळ नफ्यात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा 4245 कोटी रुपये झाला आहे. हे वार्षिक आधारावर 43 टक्के अधिक आहे. 

EBITDA मध्ये वाढ  

डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 6920.10 कोटी रुपये होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 4786.17 कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 44.58 टक्क्यांनी वाढला आहे. EBITDA देखील इयर टू इयर 59 टक्क्यांनी वाढला आहे. यावेळी तो 4293 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक कार्गो आला. देशांतर्गत कार्गो 2.5 पट राहिला. तर रेल व्हॉल्युम 1,57,904 TEUs राहिला असल्याची माहिती कंपनीनं दिली. 

6 महिन्यांत 67 टक्क्यांचा परतावा 

गेल्या सहा महिन्यांदरम्यान अदानी पोर्ट्सच्या शेअर्सच्या किमतीत 67 टक्क्यांची वाढ दिसून आली. गेल्या एका महिन्यात यात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 394.95 रुपये आहे. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास कंपनीचं मार्केट कॅप 2,74,456 कोटी रुपये होतं. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीगौतम अदानीशेअर बाजारशेअर बाजार