अदानी समूहाच्या अदानी टोटल गॅसनं मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 97.91 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च तिमाहीतच हिंडनबर्गने अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर समूहातील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स पडले होते. परंतु कंपनीनं त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते.
अदानी टोटलचा महसूल 10.2 टक्क्यांनी वाढून 1,114.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा महसूल 1,012 कोटी रुपये होता. मार्च 2022 च्या तिमाहीत मार्जिन 13 टक्क्यांवरून 17.5 टक्क्यांपर्यंत वाढलं. याशिवाय अदानी टोटल गॅसच्या संचालक मंडळानंही लाभांशाची शिफारस केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी, 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 0.25 रुपये लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार सीएनजी स्टेशनच्या नेटवर्कच्या विस्तारामुळे सीएनजीचे प्रमाण 28 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी, पीएनजीच्या किमती वाढल्यामुळं, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक ग्राहकांकडून गॅसची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे पीएनजीच्या रकमेत 13 टक्के कपात झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या अखेरीस कंपनीचे CNG स्टेशन 460 पर्यंत वाढले. कंपनीनं 126 नवीन सीएनजी स्टेशन जोडले असल्याचं सांगितलं. मंगळवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 1.29 टक्क्यांनी वाढून 956.85 रुपयांवर बंद झाला.