Adani Stocks Price : गेल्या काही काळापासून अडचणीत आलेल्या गौतम अदानींसाठी गूड न्यूज आहे. अमेरिकीतेल आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. पण, आता समूहातील एका कंपनीने पुन्हा भरारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या शेअर्समध्ये 3 डिसेंबर 2024 रोजी 8 टक्क्यांची किंवा 95 वाढ झाली अन् हा शेअर 1310 रुपयांवर पोहोचला.
कंपनीच्या कार्गो व्हॉल्यूममध्ये जोरदार वाढ
अदानी पोर्ट्सने स्टॉक एक्स्चेंजवर आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले की, कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये 36 मिलियन टन कार्गो हाताळले, जे दरवर्षी 21 टक्क्यांनी वाढत आहे. तर 2024 मध्ये नोव्हेंबरपर्यंत कंपनीने एकूण 293.7 मिलियन टन मालाची वाहतूक केली, जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या लॉजिस्टिक रेलचे प्रमाणही 10 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळेच अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली आहे.
एकाच सत्रात शेअर 95 रुपयांनी वाढला
3 डिसेंबरच्या ट्रेडिंग सत्रात अदानी पोर्ट्सचा स्टॉक 1225 रुपयांवर उघडला आणि 7.81 टक्क्यांच्या उसळीसह 1310 रुपयांवर पोहोचला. स्टॉकने मागील बंद किंमतीच्या 1215 रुपयांच्या पातळीपासून 95 रुपयांची वाढ केली आहे. स्टॉकमधील या नेत्रदीपक वाढीनंतर अदानी पोर्ट्सचे मार्केट कॅप 2.83 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या बाजार भांडवलात एकाच दिवसात 20,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
अदानी पोर्ट्सवर ब्रोकरेज हाउस बुलिश
सोमवार, 2 डिसेंबर 2024 रोजी नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने अदानी पोर्ट्सच्या स्टॉकवर कव्हरेज अहवाल जारी केला होता. ब्रोकरेज हाऊसच्या मते, स्टॉक 1960 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो, जो सध्याच्या पातळीपेक्षा 660 रुपये किंवा 50 टक्के जास्त आहे. याचा अर्थ, सध्याच्या पातळीवरही शेअर गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा देऊ शकतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने 1630 रुपये आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने 1530 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारीच मदत घ्या.)