Join us  

Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 1:07 PM

Afcons Infra IPO: सध्या शेअर बाजारात आयपीओंचा बोलबाला आहे. अनेक आयपीओंना गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आता आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे.

Afcons Infra IPO: सध्या शेअर बाजारात आयपीओंचा बोलबाला आहे. अनेक आयपीओंना गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आता आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. शापूरजी पालोनजी समूहाची प्रमुख कंपनी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (एआयएल) सात हजार कोटी रुपयांचा आयपीओ लाँच करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करते. या आयपीओमुळे कंपनीला विस्तारासाठी आवश्यक भांडवल उभारण्यास मदत होणार आहे. एफकॉन्स या कंपनीनं अबूधाबीमध्ये मंदिर आणि कोलकाता अंडरवॉटर मेट्रो तयार केली आहे.

एआयएलने २८ मार्च २०२४ रोजी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला होता. सेबीने कंपनीला 'फायनल ऑब्झर्वेशन' दिलं आहे. म्हणजेच कंपनी आता आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. हा आयपीओ ७,००० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.

Afcons फ्लॅगशिप फर्म

शापूरजी पालोनजी समूह हा भारतातील अग्रगण्य उद्योग समूहांपैकी एक आहे. बांधकाम, रिअल इस्टेट आणि टेक्स्टटाईल यासह विविध क्षेत्रांमध्ये समूहाचे व्यवसाय आहेत. एफकॉन्स ही इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपची फ्लॅगशिप फर्म आहे. बांधकाम क्षेत्रातील ही मोठी कंपनी आहे. ही कंपनी ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. त्याने भारतात आणि जगभरात अनेक मोठे प्रकल्प तयार केले आहेत. आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील २५ हून अधिक देशांमध्ये त्यांनी काम केलंय.

३५० पेक्षा अधिक प्रकल्प पूर्ण

एफकॉन्सने १९५९ पासून ३५० हून अधिक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत. ही भारतातील मरीन, एलएनजी आणि मेट्रो रेल्वे विभागातील सर्वात मोठी कंपनी आहे. महात्मा गांधी सेतू, नागपूर मेट्रो, कानपूर मेट्रो, अटल टनेल असे अनेक मोठे प्रकल्प या कंपनीने उभारले आहेत. याशिवाय चिनाब रेल्वे पूल, मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेचे दोन भाग, कोलकातामधील पूर्व-पश्चिम मेट्रो आणि जम्मू-उधमपूर महामार्गही याच कंपनीनं बांधले आहेत.

एफकॉन्सने तयार केलेले प्रकल्प अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चिनाब रेल्वे पूल. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. ईपीसी प्रकल्प पूर्ण करण्याचा एफकॉन्सचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. ही कंपनी भारतातील अव्वल अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपन्यांमध्ये गणली जाते.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार