Join us  

अदानींनंतर आता इन्फोसिस! काही सेकंदांत शेअर गडगडले, मुर्तींसह एसबीआय, एलआयसीने हजारो कोटी गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 1:16 PM

इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने आज हजारो कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. शेअरवर लोअर सर्किट लावण्याची वेळ आली आहे. 

इन्फोसिसनेशेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. गेल्या महिन्यात जसे अदानी ग्रुपने गुंतवणूकदारांचे पैसे बुडविले होते, तसेच आज इन्फोसिसच्या बाबतीत घडले आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने आज हजारो कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. शेअरवर लोअर सर्किट लावण्याची वेळ आली आहे. 

सोमवारी शेअर बाजार उघडताच काही सेकंदांतच इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यामध्ये एलआयसीची मोठी गुंतवणूक आहे. याचबरोबर मूर्ती कुटुंबियांचीही मोठी गुंतवणूक आहे. या दोघांसह अन्य गुंतवणूकदारांनाही फटका बसला आहे. २०२२-२३ च्या अखेरच्या तिमाहीमध्ये खराब कामगिरी नोंदविल्याने ही घसरण झाली आहे. 

डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस LIC कडे इन्फोसिसचे 28,13,85,267 शेअर्स म्हणजेच 7.71 टक्के हिस्सा होता. गुरुवारपर्यंत या शेअर्सचे मुल्यांकन 39,073 कोटी रुपये होते. आज सकाळी इन्फोसिसचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले. यामुळे एलआयसीचेही काही मिनिटांत 3,907 कोटींचे नुकसान होत ही गुंतवणूक 35,166 कोटी रुपयांवर आली आहे. 

मूर्ती कुटुंबाकडे कंपनीचे 8,444.47 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांची व्हॅल्यू 844 कोटी रुपयांनी घसरून 7,600 कोटी रुपयांवर आली आहे. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याकडे 1.07 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांना देखील 541 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हा फटका मूर्ती किंवा एलआयसीलाच नाही तर SBI म्युच्युअल फंडालाही बसला आहे. एसबीआयने इन्फोसिसमधील गुंतवणुकीवर अंदाजे रु. 2,239.55 कोटी गमावले आहेत. एसबीआयकडे आता 20,157 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.  

टॅग्स :इन्फोसिसशेअर बाजारएलआयसी