Join us  

३ राज्यात भाजपाच्या विजयाचा डंका वाजताच शेअर बाजारात तुफान तेजी; नवा विक्रम गाठला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 11:36 AM

आज प्री-ओपन सत्रात प्रमुख शेअर बाजार निर्देशांक निफ्टीनं नवीन विक्रमी उंची गाठली

मुंबई - लोकसभेच्या सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ५ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपानं स्पष्टपणे बहुमत मिळवलं आहे. या निकालाचे परिणाम शेअर मार्केटमध्येही पाहायला मिळाले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये तुफान तेजी दिसून येतेय. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा विक्रम गाठला. BSE सेन्सेक्स सुमारे ९०० अंकांच्या वाढीसह ६८,४३५ वर उघडला आणि निफ्टी पहिल्यांदा २०,६०१ वर पोहचला.

आज प्री-ओपन सत्रात प्रमुख शेअर बाजार निर्देशांक निफ्टीनं नवीन विक्रमी उंची गाठली. बाजारात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय आणि एल अँड टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर वाढ दिसून येत आहे. दुसरीकडे,जर आपण बीएसई सेन्सेक्सबद्दल बोललो तर, हा निर्देशांक ८८२.३८ अंकावर, १.३१ टक्क्यांच्या उसळीसह ६८,३६३.५७ च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच जवळपास २१९४ शेअर्समध्ये वाढ झाली, तर २५९ शेअर्सचे भाव गडगडले, तर ११९ शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.शेअर बाजारातील व्यवहाराच्या अवघ्या १० मिनिटांत सेन्सेक्सने १००० हून अधिक अंकांची उसळी घेतली.

निकालानं बाजाराचा वारू उधळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले. पाच वर्षांत बाजार १ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. भाजपच्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने बाजार आणखी गतीने वाढण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी आधीच व्यक्त केली होती.९ वर्षांत बाजाराचे बाजारमूल्य तब्बल ३ पट वाढले असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १५० टक्केने वाढला आहे. गुंतवणूकदारांना २० लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. २०१४ मे २०२३ पर्यंत निफ्टी ५० चे बाजारमूल्य ३ पट वाढून २८ लाख कोटींवर गेले आहे. याचवेळी सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य १९५ लाख कोटींनी वाढले आहे. या काळात जागतिक गुंतवणूकदारांनी तब्बल ४९.२१ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली असून, विदेशी गुंतवणूकदारांनी ७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :शेअर बाजार