Join us  

RPower Hits Lower Circuit : गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; Reliance Power मध्ये लागलं लोअर सर्किट; ३ दिवसांत १४% घसरला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:17 AM

Reliance Power Share : शेअर बाजाराच्या कामकाजाला मंगळवारी तेजीसह सुरूवात झाली. निफ्टीनं २५००० ची पातळी कायम राखली. तर अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट लागलं आहे.

Reliance Power Share : शेअर बाजाराच्या कामकाजाला मंगळवारी तेजीसह सुरूवात झाली. निफ्टीनं २५००० ची पातळी कायम राखली. तर अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट लागलं आहे. आज बाजार उघडताच शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. तर, गेल्या काही दिवसांत शेअरमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. आज बीएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ३१.१० रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरला.

अनिल अंबानी यांच्यावर सिक्युरिटीज मार्केटमधून पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय बाजार नियामक सेबीनं शुक्रवारी घेतल्यानंतर शेअरच्या किंमतीत घसरण झाली. दरम्यान, अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या नेतृत्वाखालील समूहातील इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. त्यांनी इंट्राडे मध्ये अनुक्रमे ४.०३ रुपये आणि २.३२ रुपयांची नीचांकी पातळी गाठली.

यापूर्वी झालेली २१ टक्क्यांची वाढ

सेबीच्या आदेशापूर्वी बुटीबोरी औष्णिक प्रकल्पाच्या अधिग्रहणासाठी अदानी पॉवरशी बोलणी सुरू असल्याच्या वृत्तानंतर रिलायन्स पॉवरचा शेअर चार ट्रेडिंग सेशनमध्ये २१ टक्क्यांनी वधारला होता. मिंटच्या वृत्तानुसार, अदानी पॉवर रिलायन्स पॉवरचा विभाग असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरशी या अधिग्रहणासाठी बोलणी करत आहे. याचं मूल्य सुमारे ४ कोटी ते ५ कोटी रुपये प्रति मेगावॅट इतके आहे.

काय म्हटलं रिलायन्स पॉवरनं?

रविवारी रिलायन्स पॉवरने सेबीच्या आदेशासंदर्भात एक निवेदन जारी केलं. यामध्ये, अनिल अंबानी यांनी रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे आणि सेबीच्या आदेशाचा कंपनीच्या कामकाजावर परिणाम होणार नसल्याचं म्हटलं होतं.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सशेअर बाजार