Elon Musk Networth : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या भाषणात इलॉन मस्क यांचा उल्लेख केला होता. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मस्क यांचे आभार मानले. टेस्ला, स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक इलॉन मस्क यांनी या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकून आणण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. एक्सवर ट्रम्प यांच्या समर्थन करणाऱ्या त्यांच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. मस्त यांना या कष्टाचे फळ आता मिळाले आहे. मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल २६.५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यामुळे ते ३०० अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचले आहेत.
एकाच दिवसात कमावले २,२३,२३६ कोटींनी वाढली
इलॉन मस्क यांच्या संपत्तीत बुधवारी कमालीची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती एका दिवसात २६.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच २,२३,२३६ कोटी रुपयांनी वाढली आहे. यासह इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २९० अब्ज झाली आहे. मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत ही वाढ टेस्लाच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षात आतापर्यंत त्यांची एकूण संपत्ती ६१.३ अब्जने वाढली आहे.
अदानी-अंबानींची नेटवर्थही वाढली
भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीतही बुधवारी वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती बुधवारी १.३० अब्जने वाढून १०० अब्जवर पोहोचली. ते जगातील १७ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ३.६२ अब्जने वाढून ९७.२ अब्ज झाली आहे. ते जगातील १८व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.
इलॉन मस्क ट्रम्प सरकारमध्ये मंत्री होणार?
या अध्यक्षीय निवडणुकीत इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना जोरदार पाठिंबा दिला होता. त्यांनी एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये ते एआय इमेजमध्ये मंत्री म्हणून शपथ घेताना दिसत होते. आता इलॉन मस्क यांना ट्रम्प सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तर एका पोस्टमध्ये मस्क आणि ट्रम्पचे AI अवतार एकत्र नाचताना व्हायरल झाले होते.