Join us  

Amara Raja Share Price : रॉकेट बनले अमारा राजाचे शेअर्स, झाली मोटी डील; ६ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे डबल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 1:44 PM

Amara Raja Share Price : ऑटोमोटिव्ह बॅटरी उत्पादक कंपनी अमारा राजाच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीचा शेअर मंगळवारी १९ टक्क्यांनी वधारून १,६५५.२० रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे डील?

Amara Raja Share Price : ऑटोमोटिव्ह बॅटरी उत्पादक कंपनी अमारा राजाच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीचा शेअर मंगळवारी १९ टक्क्यांनी वधारून १,६५५.२० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने मंगळवारी नवा उच्चांक गाठला. अमारा राजाच्या शेअर्समध्ये ही वाढ एका मोठ्या व्यवहारामुळे झाली आहे. अमारा राजा अॅडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पूर्ण मालकीच्या कंपनीने लिथियम आयन विक्री तंत्रज्ञानासाठी जीआयबी एनर्जी एक्स स्लोव्हाकियासोबत लायसन्स अॅग्रीमेंट केलं आहे.

या करारानुसार गोशन हायटेक कंपनी लिमिटेडची उपकंपनी जीआयबी एनर्जी एक्स लिथियम-आयन सेलसाठी एलएफपी तंत्रज्ञानाचा परवाना अमारा राजा अॅडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजीजला (एआरएसीटी) देणार आहे. गोशन हायटेक कंपनी लिमिटेड ही चीनमधील कंपनी आहे. या करारामुळे अमारा राजाला जागतिक दर्जाचे एलएफपी सेल्स तयार करण्यास मदत होईल.

६ महिन्यांत पैसे दुप्पट

गेल्या सहा महिन्यांत अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ११३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २६ डिसेंबर २०२३ रोजी अमारा राजाचा शेअर ७६९.६० रुपयांवर होता. २५ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर १६५५.२० रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत अमारा राजाच्या शेअरमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर अमारा राजाच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २६ जून २०२३ रोजी कंपनीचा शेअर ६४५.२० रुपयांवर होता. अमारा राजाचा शेअर २५ जून २०२४ रोजी १६५५.२० रुपयांवर पोहोचला होता. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६०९.१० रुपये आहे. गेल्या महिन्याभरात अमारा राजाच्या शेअरमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक