donald trump tariff impact : अर्थतज्ज्ञांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे मी तर बुडणार पण, तुम्हालाही सोबत नेणार असाच ठरत आहे. परस्पर शुल्काचा आंतरराष्ट्रीय बाजारांवर नकारात्मक परिणाम होत आहे. यात खुद्द अमेरिकेसोबत अनेक देशांचे शेअर बाजारांत मोठी घसरण झाली आहे. यात जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देशांच्या शेअर बाजारात भूकंप झाला आहे. भारतात तर कोरोनानंतर सर्वात मोठा क्रॅश झाला आहे. आज दिवस काळा सोमवार ठरू शकतो, असा इशाला अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.
कोणत्या देशाच्या बाजारात सर्वाधिक घसरण
सोमवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली, जिथे बाजार उघडताच जपानचा निक्केई २२५ अंकांनी घसरला. तिकडे, ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी २०० ६.५ टक्क्यांनी घसरून ७१८४.७० वर, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ५.५ टक्क्यांनी घसरून २३२८.५२ वर आला. तत्पूर्वी, शुक्रवारी अमेरिकन नॅस्डॅक बाजार सुमारे ७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते ही घसरण काहीच नाही, जर परिस्थिती नियंत्रित केली नाही तर अमेरिकन बाजाराची स्थिती १९८७ सारखी होऊ शकते. तर भारतात बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३००० तर निफ्टी ११०० अंकांनी घसरला.
आजचा दिवस काळा सोमवार ठरणार?
अमेरिकन बाजार तज्ञ जिम क्रेमर यांनी शेअर बाजाराबाबत अतिशय भीतीदायक भाकीत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की ७ एप्रिल १९८७ प्रमाणे सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी सर्वात वाईट दिवस ठरू शकतो. सीएनबीसीवरील त्याच्या मॅड मनी शोमध्ये, क्रेमर यांनी स्पष्टपणे इशारा दिला. ट्रम्प यांनी रेसिप्रोकल शुल्क लागू न केलेल्या देशांशी संपर्क साधला नाही तर बाजारात १९८७ सारखा क्रॅश येऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की जर राष्ट्राध्यक्षांनी नियमांचे पालन करणाऱ्या देशांना आणि कंपन्यांना प्रोत्साहन दिले नाही तर आपल्याला १९८७ सारखे दृश्य दिसू शकते. २ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर किमान १० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. यानंतर अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. डोऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस अँड पी ५००. तिन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. डाऊ जोन्स २२०० हून अधिक अंकांनी घसरला आणि ५.५० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याच वेळी नॅस्डॅक ९०० अंकांनी घसरला आणि ५.८२ टक्क्यांनी घसरला. तर एस अँड पी ५०० मध्ये ५.९७ टक्क्यांनी मोठी घसरण झाली.
वाचा - शेअर बाजारासाठी 'Black Monday'; सेन्सेक्स ३००० नं आपटला, निफ्टीमध्येही ११०० अंकांची घसरण
काळा सोमवार काय होता?
हे संकट केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नाही, तर युरोप, आशिया आणि भारतातील बाजारपेठांनाही या घसरणीचा फटका बसला. गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्स बुडाले. अर्थतज्ज्ञ जिम क्रेमर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले, की १९८७ सारखी परिस्थिती जगाला परवडणारी नाही. १९ ऑक्टोबर १९८७ मध्ये, डाऊ जोन्स एका दिवसात २२.६ टक्क्यांनी घसरला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा एकदिवसीय क्रॅश मानला जातो. त्यावेळी या घटनेने अमेरिका हादरली आणि नंतर अनेक आर्थिक धोरणे बदलण्यात आली.