Anand Mahindra Share Market : शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेच्या ग्रोथ रिपोर्टचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या शेअर बाजारावर दिसून आला होता. शेअर बाजारात भारतात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, गुंतवणूकदारांचे सुमारे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. बाजारातील प्रचंड घसरणीदरम्यान देशातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
"प्राणायामाची प्राचीन भारतीय पद्धत अंमलात आणण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही. प्राणायामामध्ये दीर्घ श्वास घेताना अंतरंगात डोकावावं लागतं. मला जे दिसतंय तो असा भारत आहे जो जगात एक ओएसिस आहे. ज्याच्या उदयात मध्यम आणि दीर्घ काळात कोणतेही अडथळे येणार नाहीत," असं आनंद महिंद्रा म्हणाले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली.
सोमवारी जगभरातील शेअर बाजारात आलेला भूकंप
अमेरिकेतील मंदीची भीती आणि जागतिक बाजारातील उलथापालथीमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे एका झटक्यात सुमारे १५.५ लाख कोटी रुपये बुडाले. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही २.५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये आणखी जोरदार विक्री दिसून आली.
बीएसई मिडकॅप निर्देशांक ३.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४.२१ टक्क्यांनी घसरून बंद झाला. बीएसईचे सर्व सेक्टोरल निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. मेटल, रियल्टी, कॅपिटल गुड्स आणि युटिलिटी शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स २,२२२.५५ अंकांनी म्हणजेच २.७४ टक्क्यांनी घसरून ७८,७५९.४० वर बंद झाला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ६६७.७५ अंकांच्या घसरणीसह २४,०५५.६० च्या पातळीवर बंद झाला.