शेअर बाजाराच्या तेजीच्या काळात महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये शुक्रवारी चांगली वाढ नोंदवण्यात आली. 14 फेब्रुवारी रोजी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 1662 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते, जे शुक्रवारी कामकाजाच्या सुरुवातीला 1806 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. त्यानुसार 15 आणि 16 फेब्रुवारीला महिंद्र अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये अवघ्या 2 दिवसांत 144 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी शेअर बाजाराच्या कामकाजात तेजी होती आणि सुरुवातीच्या कामकाजात बीएसई सेन्सेक्स, तसंच एनएसई निफ्टी चांगल्या गतीनं काम करत होते.
महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये गुरुवारी 6.5 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आणि त्यांनी 1765 रुपयांची पातळी गाठली. शुक्रवारी पुन्हा एकदा महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि त्यांनी 1806 रुपयांची पातळी गाठली. महिंद्रा अँड महिंद्रानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि ती 2454 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या महसुलात डिसेंबर तिमाहीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आघाडीची कंपनी
महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील एसयुव्ही व्यवसायातील एक आघाडीची कंपनी आहे जिचा रेव्हेन्यू मार्केट शेअर 21 टक्के आहे. आनंद महिंद्राकडे महिंद्र अँड महिंद्राचे 14.30 लाख शेअर्स आहेत. महिंद्र अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये अवघ्या दोन कामकाजाच्या दिवसांत 144 रुपयांची वाढ झाल्याने आनंद महिंद्रा यांच्या संपत्तीत 20.59 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एसयुव्ही व्यवसायातील दिग्गज महिंद्राचे मार्केट कॅप 2.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1813 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1123 रुपये आहे. कोरोना महासाथीदरम्यान 27 मार्च 2020 रोजी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सनं 294 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती, या पातळीवरून गुंतवणूकदारांना 500 टक्के बंपर परतावा मिळाला आहे.