Anil Ambani News : गेल्या काही वर्षांपासून अनिल अंबानी यांच्या कंपन्या संकटात सापडल्या होत्या. अनिल अंबानींनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं होतं. परंतु आता त्यांच्या कंपन्यांवरील कर्ज हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळानं २,९३० कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. व्हीएफएसआय होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडला एफसीसीबी जारी करून निधी उभारण्यास मान्यता मिळाली आहे. एफसीसीबी अनसिक्युएर्ड असतील आणि त्यांच्याकडे १० वर्षांच्या दीर्घ मुदतीसह वार्षिक ५ टक्के अल्ट्रा-लो कॉस्ट कूपन असेल.
त्याचबरोबर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या बोर्डानं कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम (ईएसओएस) मंजूर केली आहे. याअंतर्गत कंपनी ८५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे २.६० कोटी इक्विटी शेअर्स देणार आहे, जे हे शेअर्स जारी केल्यानंतर शेअर्सच्या ५ टक्के इतके असेल.
शेअर्सची स्थिती काय?
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारी तो १.२० टक्क्यांनी घसरून ३३२.१५ रुपयांवर बंद झाला. या शेअरनं दिवसभरात ३४२ रुपयांचा उच्चांक गाठला. २४ सप्टेंबर २०२४ रोजी हा शेअर ३५०.९० रुपयांवर बंद झाला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
कंपनीला मिळाली गुंतवणूक
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला प्रवर्तकांकडून ११०० कोटी रुपये आणि मुंबईतील दोन गुंतवणूक कंपन्यांकडून १,९१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळणार आहे. नुकतीच कंपनीच्या संचालक मंडळानं सहा हजार कोटी रुपयांच्या निधी उभारणीच्या योजनेला मंजुरी दिली. यापैकी ३,०१४ कोटी रुपये शेअर्सच्या प्राधान्य वाटपाद्वारे आणि ३,००० कोटी रुपये संस्थात्मक खरेदीदारांना शेअर्स जारी करून उभे केले जातील.
कर्ज कमी करण्यावर भर
अनिल अंबानी यांनी ज्या वेगानं आपल्या कंपन्यांचं कर्ज फेडण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि त्याच वेळी आपल्या कंपन्यांच्या भविष्यातील विस्तारासाठी निधी उभारणीच्या योजना जाहीर केल्या, तसंच त्या अंमलात आणल्या, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रिलायन्स पॉवरची उपकंपनी रोझा पॉवरनं नुकतेच सिंगापूरस्थित वर्डे पार्टनर्सचं ८५० कोटी रुपयांचे कर्ज फेडलं. रिलायन्स पॉवरवरील कर्ज संपल्यानंतर आता रोझा पॉवर आता कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी पुढील तिमाहीत उर्वरित कर्जाची परतफेड करण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)