अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स जोरदार आपटले आहेत. बाजारात दुसऱ्या दिवशी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स घसरले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सही शुक्रवारी 20 टक्क्यांनी घसरून 181.95 रुपयांवर पोहोचले. बुधवारीही रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली आणि कंपनीचे शेअर्स 227.40 रुपयांवर बंद झाले. गेल्या 2 दिवसात रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 36 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. सर्वोच्च न्यायालयानं आर्बिट्रल अवॉर्ड रद्द केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे.
रिलायन्स पॉवरचे शेअर्सही आपटले
अनिल अंबानींच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power) शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. रिलायन्स पॉवरचा शेअरही 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 26.93 रुपयांवर पोहोचला. बुधवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्येही 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं आणि कंपनीचे शेअर्स 28.34 रुपयांवर बंद झाले. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांत चांगली रिकव्हरी झाली होती. कंपनीचे शेअर्स एका वर्षात 125 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 34.35 रुपये आहे.
अनिल अंबानींना मोठा झटका
एकीकडे समस्या कमी होत असल्याचं दिसत असतानाच अनिल अंबानींना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी 8000 कोटी रुपयांचा आर्बिट्रल अवॉर्ड रद्द केला. आर्बिट्रल अवॉर्ड अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची युनिट असलेल्या दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (DAMEPL) बाजूनं होता. दरम्यान, आर्बिट्रल अवॉर्ड रद्द झाल्यानंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून सुरू झाली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)