Anil Ambani Stocks On Fire : उद्योजक अनिल अंबानी यांचे अच्छे दिन सुरू झाल्याचे शेअर बाजारातील हालचालींवरुन दिसत आहेत. अंबानींच्या स्टॉक एक्स्चेंज लिस्टेड कंपन्या, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बुधवारी (१८ सप्टेंबर) ट्रेडिंग सत्रात आश्चर्यकारक कामगिरी केली. रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांच्या उसळीनंतर अपर सर्किटमध्ये आहे, तर रिलायन्स इन्फ्राचा शेअर सुमारे १६ टक्क्यांच्या उसळीसह २७२ रुपयांवर पोहोचला आहे. दोन्ही शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे रिलायन्स पॉवर ही पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी झाली आहे. तर रिलायन्स इन्फ्राने ३ हजार ८३१ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. आता कंपनीकडे केवळ ४७५ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.
अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर कर्जमुक्तरिलायन्स पॉवरने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे जामीनदार म्हणून ३ हजार ८७२.०४ कोटी रुपयांचे थकित कर्ज फेडले. मंगळवारी (१७ सप्टेंबर, २०२४) संध्याकाळी उशिरा रिलायन्स पॉवरने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. यासह कंपनीने CFM Asset Reconstruction Private Limited सोबतचे सर्व वाद सोडवले आहेत. रिलायन्स पॉवरने दिलेल्या कॉर्पोरेट हमीच्या बदल्यात, विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे 100 टक्के शेअर्स सीएफएमच्या नावे गहाण ठेवण्यात आले.
या बातमीमुळे रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांच्या उसळीसह ३२.९७ रुपयांवर उघडला आणि शेअर अपर सर्किटला लागला. रिलायन्स पॉवर ही खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनी कोळसा, गॅस, जलविद्युत आणि अक्षय ऊर्जा आधारित प्रकल्पांद्वारे ५ हजार ३०० मेगावॅट वीज निर्मिती करते.
अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअरही तेजीत आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर २०२४) कंपनीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये सांगितले की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवरील एकूण थकित कर्ज ३ हजार ८३१ कोटी रुपयांवरून ४७५ कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीने सांगितले की, इंवेन्ट एआरसीची थकबाकी शून्यावर आली आहे. याशिवाय, रिलायन्स इन्फ्राने एलआयसी, एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, युनियन बँकेसह इतर कर्जदारांची थकित कर्जे देखील भरली आहेत. कंपनीचे बाह्य कर्ज दायित्व ४७५ कोटी रुपयांवर आणले आहे.
रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी झाल्यानंतर, रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्सने सुमारे १७ टक्क्यांनी झेप घेतली आहे. दिवसभराच्या व्यवहारात तो २७५.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. गेल्या सत्रात शेअर २३५.६१ रुपयांवर बंद झाला होता.