Anil Ambani Share Market: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरचा (Reliance Power) शेअर गुरुवार(4 जानेवारी) रोजी 19.46 टक्क्यांनी वाढून 31 रुपयांवर पोहोचला. या वाढीसह शेअरने 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपासून यात सतत वाढ होत आहे. या वाढीमुळे अनेकांनी हे शेअर खरेदी केले.
किंमत अजून किती वाढेल?
रिलायन्स पॉवरच्या शेअरने गेल्या एका महिन्यात 39 टक्के, एका वर्षात 112 टक्के तर तीन वर्षांत तब्बल 3000 टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी, म्हणजे 2020 मध्ये, रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत फक्त 1 रुपये होती, जी आता 31 रुपये झाली आहे. या कालावधीत शेअरने 31 पट परतावा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेली चार्टवर स्टॉक मजबूत दिसत आहे. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की, हा स्टॉक 35 ते 43 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
प्रवर्तकांचा एवढा हिस्सा
रिलायन्स पॉवर पूर्वी रिलायन्स एनर्जी जनरेशन लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, जी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचा एक भाग आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत प्रवर्तकांकडे कंपनीत 24.49 टक्के हिस्सा होता. गेल्या वर्षी अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, या कंपन्यांनी रिलायन्स कमर्शियल फायनान्समधून 1,000 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्याच्या प्रक्रियेत गुंतले होते. यासाठी, रिलायन्स कमर्शियलला 20 रुपये प्रति शेअर दराने 7,59,77,000 इक्विटी शेअर्स वाटप करण्यात आले.
(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)