Join us

अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:05 PM

Anmol Ambani Update: यापूर्वी सेबीने ऑगस्ट 2024 मध्ये अनिल अंबानी यांना 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Anmol Ambani Update: शेअर बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांचा मुलगा जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) याला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिलायन्स होम फायनान्सने तपासाशिवाय कॉर्पोरेट कर्ज मंजूर केल्याबद्दल SEBI ने हा दंड ठोठावला आहे. रिलायन्स हाऊसिंग फायनान्सच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर असलेले कृष्णन गोपालकृष्णन यांनाही सेबीने 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दोघांनाही 45 दिवसांच्या आत दंड भरावा लागेल, असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.

SEBI ने सोमवार, 23 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले की, आमचा रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या बाबतीत सुरू असलेला तपास पूर्ण झाला आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असलेल्या अनमोल अंबानी यांनी कर्ज देण्याची परवानगी नसताना कॉर्पोरेट कर्ज दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे हे कृत्य सेबीच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळेच त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, अनमोल अंबानी यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी अक्युरा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. पण, संचालक मंडळाने 11 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाला कर्ज न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. सेबीचा हा आदेश अशावेळी आला आहे, जेव्हा ऑगस्ट 2024 मध्ये SEBI ने अनिल अंबानी आणि इतर 24 लोकांवर रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या निधीच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणात पाच वर्षांसाठी बंदी घातली होती आणि त्यांच्यावर 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला होता.

आपल्या आदेशात सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर 24 लोकांना सिक्युरिटीज मार्केटमधून पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले होते. सेबीने म्हटले आहे की, अनिल अंबानी कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी मार्केटशी संबंधित राहणार नाहीत किंवा ते कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती म्हणून काम करणार नाहीत.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्ससेबीशेअर बाजार