Join us  

गौतम अदानींवर आणखी एक नवं संकट! एक अहवाल अन् बाजार खुला होताच समूहाचे सर्व शेअर धडाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:21 PM

समूहातील सर्वच्या सर्व  दहा लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली...

नवी दिल्ली - अदानी समूहाच्या सर्वच शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली आहे. एका माध्यम समूहाच्या अहवालानंतर, ही घसरण दिसून येत आहे. या अहवालात, अदानी समूहाने गुपचूपपणे आपलेच शेअर खरेदी करून स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र यामुळे अदानी समूहाचे शेअर्स, आज बाजार खुला होताच घसरल्याचे दिसून आले. महत्वाचे म्हणजे, समूहातील सर्वच्या सर्व  दहा लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. 

समूहातील फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसचा शेअर बुधवारी 2513.60 रुपयांवर बंद झाला होता आणि आज घसरणीसह 2453.65 रुपयांवर खुला झाला. सकाळी 11.40 वाजताच्या सुमारास 2.28 टक्क्यांच्या घसरणीसह तो 2,455.75 रुपयांवर ट्रेड करत होता. याच्या सोबतच अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, एनडीटीव्ही, अंबूजा सिमेंट्स आणि एसीसीच्या शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे. अदानी पॉवर, अदानी पॉवर सॉल्यूशन्स आणि अदानी ग्रीनच्या शेयर्समध्ये जवळफास तीन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

अहवालात नेमकं काय...? -ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या (OCCRP) या अहवालानुसार, समूहातील कंपन्यांनी 2013 ते 2018 या काळात गुपचूप आपलेच शेअर खरेदी केले आणि स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखों डॉलर्सची गुंतवणूक केली. किमान दोन प्रकरणं असे आहेत की, गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमाने अदानी समूहाच्या शेअर्सची खरेदी  विक्री केल्याचे तपासातून समोर आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

अदानी समूहाने आरोप फेटाळले -मात्र यातच, अडानी समूहाने एक निवेदन जारी करत, हे आरोप फेटाळून लावले आहेत. समूहाचे म्हणणे आहे की, हे सोरोसला सपोर्ट करणाऱ्या संघटनांचे कारस्थान वाटत आहे. हिंडनबर्ग अहवाल पुन्हा उभा करता यावा, यासाठी परदेशी प्रसारमाध्यमांचा एक समूहदेखील याला हवा देत आहे. हे दावे एका दशकापूर्वी बंद झालेल्या प्रकरणांवर आधारलेले आहेत.

 

 

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार