Join us  

शेअर्स विकताच खात्यात येणार पैसे, वाट पाहावी लागणार नाही; पाहा काय आहे SEBI चा नवा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:43 AM

सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रणालीला T+1 सेटलमेंट म्हणतात. पण आता बाजार नियामक सेबी यात बदल करण्याच्या विचारात आहे.

सध्या तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल आणि कोणताही शेअर विकला तर त्याची रक्कम दुसऱ्या दिवशी तुमच्या डिमॅट खात्यात दिसून येते. सध्याच्या या प्रणालीला टी प्लस वन सेटलमेंट म्हणतात. भारताच्या बाजार नियामक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं २८ मार्चपासून ऑप्शनल बेसिसवर टी + झिरो ट्रेड सायकल सेटलमेंट सुरू करण्याची योजना आखली आहे. याचा अर्थ असा की ट्रेडिंगची रक्कम तुम्ही ज्या दिवशी ट्रेड करता त्याच दिवशी तुमच्या डीमॅट खात्यात जमा होईल. 

सध्या भारतीय शेअर बाजारात टी प्लस वन सेटलमेंट सायकल चालते. टी प्लस झिरो सेटलमेंट म्हणजे शेअर्सची ज्या दिवशी विक्री केली जाईल त्याच दिवशी तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल आणि तुम्ही लगेच पैसे वापरू शकता. बाजार नियामक सेबीनं ने T+0 सेटलमेंट दोन टप्प्यात लागू करण्याची योजना आखली आहे. T+0 सेटलमेंटच्या पहिल्या टप्प्यात, नियामकानं शेअर बाजारात दुपारी १.३० वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी त्याच दिवशी सेटलमेंट प्रस्तावित केली आहे. 

काय आहे सेबीचा प्लॅन? 

जर तुम्ही दुपारी १:३० वाजेपूर्वी व्यवहार केला असेल, तर तुमच्या डिमॅट खात्यातील फंड आणि तुमच्या डिमॅट खात्यातील स्टॉक त्याच दिवशी दुपारी ४:३० वाजेपर्यंत काढले जातील. दुसऱ्या टप्प्यात सेबीनं पर्याय म्हणून इंमिडिएट ट्रेड बाय ट्रेड सेटलमेंटची व्यवस्था केली आहे.  

दुसऱ्या टप्प्यात, तुम्ही दुपारी ३.३० वाजेपर्यंत व्यवहार केला असला तरीही, फंड तुमच्या डिमॅट खात्यात येईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस फेज वनमध्ये पर्यायी T+0 सेटलमेंट लागू केली जाऊ शकते, असे सेबी प्रमुखांनी म्हटलं आहे. शेअर बाजारात व्यापार करणाऱ्या इनव्हेस्टर्स आणि ट्रेडर्ससाठी इन्स्टंट सेटलमेंट म्हणजे बाजारातील तरलतेची स्थिती सुधारणं हा आहे.

टॅग्स :शेअर बाजारसेबीशेअर बाजार