Bajaj Housing Finance : अलीकडेच शेअर बाजारात दाखल झालेल्या बजाज हाउसिंग फायनान्सचे (Bajaj Housing Finance) शेअर्स सोमवारी चांगलेच घसरले. सोमवारी हा शेअर 6 टक्क्यांहून अधिक घसरुन 140.40 रुपयांवर आला. कंपनीच्या शेअर्समधील अँकर गुंतवणूकदारांसाठी एक महिन्याचा लॉक-इन कालावधी सोमवारी(14 ऑक्टोबर) संपला, त्यानंतर ही घसरण पाहायला मिळाली.
3 महिन्यांचा लॉक-इन पीरियड 12 डिसेंबर रोजी संपेल
एका महिन्याच्या लॉक-इन कालावधीच्या समाप्तीसह, 12.6 कोटी शेअर्स किंवा कंपनीचे 2% शेअर्स ट्रेडिंगसाठी पात्र असतील. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये असे म्हटले आहे. या वर्षी 12 डिसेंबर रोजी बजाज हाउसिंग फायनान्स शेअर्सचा 3 महिन्यांचा लॉक-इन कालावधी संपेल आणि 12.6 कोटी अतिरिक्त शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. लॉक-इन कालावधी संपल्याचा अर्थ असा नाही की, हे सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, परंतु केवळ ते ट्रेडिंगसाठी पात्र असतील.
कंपनीचे शेअर्स लिस्टिंग किमतीच्या खाली आले
बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स त्यांच्या लिस्टिंग किमतीच्या खाली आले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO 9 सप्टेंबर 2024 रोजी खुला झाला होता, तर 11 सप्टेंबरपर्यंत यात गुंतवणूक करता येत होती. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 70 रुपये ठेवण्यात आली होती. तर, 16 सप्टेंबर 2024 रोजी बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स 150 रुपयांवर सूचीबद्ध झाले आणि दिवस संपेपर्यंत 164.99 रुपयांवर आले. आता आज 14 ऑक्टोबर 2024 रोजी बजाज हाउसिंग फायनान्सचे शेअर्स 140.40 रुपयांवर पोहोचले आहेत.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)