Join us  

Bajaj Housing Finance IPO बाबत मोठी अपडेट, ९ सप्टेंबरला होणार ओपन; ग्रे मार्केटमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 2:01 PM

Bajaj Housing Finance IPO : सध्या अनेकांना बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओनं प्राइस बँड जाहीर केला आहे. कंपनीनं आयपीओसाठी १० रुपयांच्या फेस व्हॅल्सूसाठी ६६ ते ७० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केलाय. गुंतवणूकदारांना ९ सप्टेंबर २०२४ पासून या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणारे. तर, ११ सप्टेंबरपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी (मोठ्या गुंतवणूकदारांसाठी) ६ सप्टेंबर रोजी खुला होणार आहे.

आयपीओमध्ये आपल्या शेअर्सचा प्राइस बँड ६६-७० रुपये असेल, असं कंपनीनं म्हटलंय. बजाज हाऊसिंग फायनान्सचे आयपीओच्या एका लॉटमध्ये २१४ शेअर्स आहेत. म्हणजेच बजाजच्या आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १४,९८० रुपयांची गरज भासणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉट म्हणजेच १ लाख ९४ हजार ७४० रुपयांची गुंतवणूक करू शकतील.

काय आहे जीएमपी? (Bajaj Housing Finance IPO GMP today)

कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. इन्व्हेस्टर्स गेन्सच्या रिपोर्टनुसार, आयपीओ आज ५५.५० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. लिस्टिंगपर्यंत हीच परिस्थिती राहिल्यास आयपीओचं लिस्टिंग १२० रुपयांच्या पुढे जाऊ शकते. तसं झाल्यास गुंतवणूकदारांना आधीच मोठा फायदा होणार आहे.

आरबीआयच्या नवीन नियमामुळे आणला IPO

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांचं पालन करण्यासाठी शेअर विक्री केली जात आहे. या अंतर्गत, उच्च स्तरावरील नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना (NBFCs) सप्टेंबर २०२५ पर्यंत स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणं आवश्यक आहे. आयपीओमधून मिळणारे पैसे कंपनीचा भांडवल आधार वाढवण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जातील. 

कंपनीबद्दल सांगायचं झालं तर, बजाज हाऊसिंग फायनान्स ही एक हाऊसिंग फायनान्स कंपनी असून, सप्टेंबर २०१५ पासून नॅशनल हाऊसिंग बँकेत नोंदणीकृत आहे. ही उच्च श्रेणीतील एनबीएफसी म्हणून ओळखली जाते.

गेल्या वर्षी किती नफा?

२०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीला १,७३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील १,२५८ कोटी रुपयांपेक्षा हे प्रमाण ३८ टक्क्यांनी अधिक आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आणि इंडिया शेल्टर फायनान्स, या दोन हाऊसिंग फायनान्स कंपन्या आहेत, ज्या अलिकडच्या काही महिन्यांत स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाल्या आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सनं जूनमध्ये ७,००० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे प्रॉस्पेक्टस सादर केले होते. बाजार नियामकाने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीच्या आयपीओसाठी मान्यता दिली.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार