Join us  

Bajaj Housing Finance IPO : गुंतवणूकदारांकडून 'बजाज'वर प्रेमाचा वर्षाव; मागितलेले ६,५६० कोटी, लोकांनी झोळीत टाकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 8:34 AM

Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळलाय. पाहा किती मिळालं सबक्रिप्शन आणि कधी होणार आयपीओ लिस्ट. जाणून घ्या किती आहे ग्रे मार्केट प्रीमिअम.

Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळलाय. ऑफरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बुधवारी ६,५६० कोटी रुपयांच्या इश्यूला ६३.६० पट सब्सक्राइब करण्यात आलं. यासाठी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोली लागली. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओमध्ये ७२,७५,७५,७५६ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत एकूण ४६,२७,४८,४३,८३२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती.

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा २९०.३६ पट सबस्क्राइब झाला. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ४१.५० पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ७.०२ पट सबस्क्राइब झाला.

काही वेळातच झालेला पूर्ण सबस्क्राइब

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) सोमवारी उघडल्यानंतर काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. इश्यू उघडण्यापूर्वी कंपनीने शुक्रवारी प्रमुख (अँकर) गुंतवणूकदारांकडून १,७५८ कोटी रुपये जमा केले होते. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी प्राईज बँड (Bajaj Housing Finance IPO Price Band) ६६ ते ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. या आयपीओमध्ये ३,५६० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स आणि मूळ कंपनी बजाज फायनान्सकडून ३,००० कोटी रुपयांच्या विद्यमान शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांचे पालन करण्यासाठी ही शेअर विक्री केली जात आहे. यानुसार आघाडीच्या नॉन बँकिंग फायान्शिअल कंपन्यांना सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होणं आवश्यक आहे.

ग्रे मार्केट प्रीमिअम किती?

बजाज हाऊसिंगचा (Bajaj Housing) शेअर ग्रे मार्केटमध्ये ७० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या (अप्पर प्राइस बँड) तुलनेत १०४.२९ टक्के प्रीमियमवर व्यवहार करताना दिसला. या शेअरची लिस्टिंग १६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. 

गेल्या महिन्यात प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या आयपीओसाठी १.४८ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती. यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओसाठी एकूण १.५६ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती. २००८ मध्ये कोल इंडिया लिमिटेडच्या आयपीओसाठी २.३३ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती.

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक