Join us  

Bajaj Housing Finance: लिस्टिंगच्या दिवशी होणार का पैसे दुप्पट? किती आहे GMP; कधी होणार लिस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:04 PM

Bajaj Housing Finance IPO:  बजाज फायनान्सच्या मालकीची कंपनी आणि डायव्हर्सिफाइड एनबीएफसी बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा पब्लिक इश्यू बंद झाला आहे. आता हा आयपीओ कधी लिस्ट होणार याची गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहेत.

Bajaj Housing Finance IPO:  बजाज फायनान्सच्या मालकीची कंपनी आणि डायव्हर्सिफाइड एनबीएफसी बजाज हाऊसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance) कंपनीचा पब्लिक इश्यू बंद झाला आहे. आता हा आयपीओ १६ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे. हा आयपीओ एकूण ६७.४३ पट सब्सक्राइब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा २२२ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ४३.९८ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ७.४१ पट सबस्क्राइब झाला होता. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला हिस्सा २.१३ पट सबस्क्राइब झाला.

अनेक वर्षांनंतर बजाज समूहाची एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. लिस्टिंगच्या दिवशी कंपनी दमदार सुरुवात करू शकते आणि गुंतवणूकदारही मोठा नफा कमावू शकतात, अशी अपेक्षा आहे. investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, ग्रे मार्केटमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स ७० रुपयांच्या आयपीओच्या अपर प्राइस बँडपेक्षा १११.४३ टक्के अधिक प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. या आधारावर शेअर १४८ रुपये म्हणजेच दुप्पट किंमतीत लिस्ट होऊ शकतात. ग्रे मार्केट हे एक अनऑथोराइज्ड मार्केट आहे जिथे एखाद्या कंपनीचे शेअर्स लिस्टिंग होईपर्यंत व्यापार करतात.

३ लाख कोटींपेक्षा अधिकचं सबस्क्रिप्शन

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. ऑफरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बुधवारी ६,५६० कोटी रुपयांच्या इश्यूला ६३.६० पट सब्सक्राइब करण्यात आलं. यासाठी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोली लागली. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओमध्ये ७२,७५,७५,७५६ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत एकूण ४६,२७,४८,४३,८३२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती.

काही वेळातच झालेला पूर्ण सबस्क्राइब

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) सोमवारी उघडल्यानंतर काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. इश्यू उघडण्यापूर्वी कंपनीने शुक्रवारी प्रमुख (अँकर) गुंतवणूकदारांकडून १,७५८ कोटी रुपये जमा केले होते. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी प्राईज बँड (Bajaj Housing Finance IPO Price Band) ६६ ते ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. या आयपीओमध्ये ३,५६० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स आणि मूळ कंपनी बजाज फायनान्सकडून ३,००० कोटी रुपयांच्या विद्यमान शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांचे पालन करण्यासाठी ही शेअर विक्री केली जात आहे. यानुसार आघाडीच्या नॉन बँकिंग फायान्शिअल कंपन्यांना सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होणं आवश्यक आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक