Join us

Bangladesh Crisis : बांगलादेशमधील तणावाचा 'या' कंपनीला फटका; गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 12:30 PM

Marico Share Falls 4% :  बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय संकटाचा परिणाम भारतातील काही लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी?

Marico share price:  बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय संकटाचा परिणाम (bangladesh crisis) भारतातील काही लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला आहे. त्यातील एक शेअर मॅरिको लिमिटेडचा (Marico Limited share) आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी एफएमसीजी कंपनी मॅरिको लिमिटेडचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरला आणि किंमत ६४२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आली. ३० जुलै २०२४ रोजी हा शेअर ६९०.९५ च्या पातळीवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मॅरिकोला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बांगलादेशातून येतो. कंपनीच्या एकूण उत्पन्नात या देशाचा वाटा एक चतुर्थांश इतका आहे. मॅरिकोच्या महसुलापैकी १२ टक्के महसूल बांगलादेशच्या बाजारपेठेतून मिळतो. मॅरिको बांगलादेशातील ५ पैकी ४ घरांपर्यंत पोहोचल्याचा कंपनीचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.

मॅरिकोच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष २०२२ च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय महसुलात बांगलादेशचा वाटा ५१ टक्के होता, जो आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, किंमत आणि वॉल्यूम ग्रोथ हळूहळू वाढत असल्यानं महसुली वाढ जास्त राहण्याची अपेक्षा आहे. डिस्ट्रिब्युशन आणि मागणी सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षांत ८० ते १०० कोटी रुपये खर्च करण्याची कंपनीची योजना आहे.

जून तिमाहीचे निकाल काय?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मॅरिको लिमिटेडचा नफा ८.७१ टक्क्यांनी वाढून ४७४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४३६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न ६.७ टक्क्यांनी वाढून २,६४३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत २,४७७ कोटी रुपये होते. सॅफोला, पॅराशूट आणि लिव्हॉन सारख्या लोकप्रिय ब्रँडची मालकी असलेल्या मॅरिकोच्या ग्रॉस मार्जिनमध्ये २.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, त्याचा एकूण खर्च ६.०८ टक्क्यांनी वाढून २,०७५ कोटी रुपये झालाय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक