Join us  

Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:22 PM

Bank Of Baroda News : सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेचा निव्वळ नफा ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या मार्च तिमाहीत २.३ टक्क्यांनी वाढून ४,८८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता बँकेनं डिविडंड देण्याचा निर्णय घेतलाय.

Bank Of Baroda News : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचा (Bank Of Baroda) निव्वळ नफा ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या मार्च तिमाहीत २.३ टक्क्यांनी वाढून ४,८८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेनं जानेवारी-मार्च २०२४ चे तिमाही निकाल शेअर बाजाराला कळवले. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ४,७७५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कालावधीत बँकेचं एकूण उत्पन्न वाढून ३३,७७५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत २९,३२३ कोटी रुपये होतं. 

ग्रॉस एनपीएमध्ये सुधारणा 

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत बँकेचं व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न वाढून २९,५८३ कोटी रुपये झालं. जानेवारी-मार्च २०२३ मध्ये ते २५,८५७ कोटी रुपये होतं. या तिमाहीत बँकेच्या एनपीएमध्ये सुधारणा होऊन ते २.९२ टक्क्यांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी ३.७९ टक्के होतं. निव्वळ एनपीएही गेल्या वर्षीच्या ०.८९ टक्क्यांवरून ०.६८ टक्क्यांवर आलाय. यामुळे बुडीत कर्जाची तरतूद ही गेल्या वर्षीच्या १,४२१ कोटी रुपयांवरून १,३०२ कोटी रुपयांवर आली आहे. 

बँक ऑफ बडोदाचा नफा संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २६ टक्क्यांनी वाढून १७,७८९ कोटी रुपये झाला आहे, जो २०२२-२३ या आर्थिक वर्षात १४,११० कोटी रुपये होता. बँकेचं एकूण उत्पन्नही २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९९,६१४ कोटी रुपयांवरून गेल्या आर्थिक वर्षात १,२७,१०१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

डिविडंडची घोषणा 

बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळानं दोन रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर ७.६० रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर मंजुरी घेण्यात येणार आहे. बँकेच्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर तो २५५.६५ रुपयांवर बंद झाला. आदल्या दिवसाच्या तुलनेत हा शेअर २.६७ टक्क्यांनी घसरला. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक