केतन गोरानिया
वित्तीय सल्लागार
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग ६.५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळे यंदाच्या वर्षी भारतीय शेअर बाजारात पैसा येताना दिसेल.
मार्च २०२२ आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये याच ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या लेखातून बाजारातील अस्थिरतेबाबत मी भारतीय गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला होता; पण आज भारतीय बाजारात आव्हाने असली तरी त्यातही दडलेल्या आशावादाबद्दल मला ऊहापोह करायचा आहे.
सध्या भारतीय शेअर बाजाराचे बाजारमूल्य हे ३.२१ ट्रिलियन डॉलर इतके आहे आणि भारताचा जीडीपी पुढच्या वर्षी ६.५ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेअर बाजाराच्या बाजारमूल्याच्या तुलनेत जीडीपीचे प्रमाण हे ०.८६ टक्के असेल. तसेच, अनेक कंपन्यांच्या समभाग किमती देखील याच प्रमाणात खाली येताना दिसतील. त्यामुळे जोखीम घेण्याच्या दृष्टीने ही एक चांगली संधी आहे, असे म्हणता येईल. त्यातच भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीला ब्रेक लावला आहे. आगामी काळात व्याजदर स्थिरच राहतील असे दिसते. या सकारात्मक मुद्यांच्या अनुषंगाने भारतीय व्यावसायिकांना व्यवसाय नफ्याचे प्रमाण वाढविणे शक्य होईल; मात्र त्याचवेळी आंतरराष्ट्रीय वातावरणातील अस्थिरतेमुळे देशातील तंत्रज्ञान उद्योगाला मात्र वादळी स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
विकसित होऊ पाहणाऱ्या अन्य देशातील शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आजही भारतीय कंपन्यांच्या समभागाचे मूल्य अजूनही तितकेसे स्वस्त नाही. भारतीय मार्केटमध्ये जरी अगदी ५० टक्क्यांपर्यंत घसरण झालेली असली तरी (गेल्यावर्षी ती १०० टक्क्यांपर्यंत झाली होती.) समभाग स्वस्त नाहीत. मंदी किंवा व्याजदर वाढीमुळे अमेरिकी मार्केट गुंतवणूकदारांच्या पसंतीक्रमात तूर्तास तरी नाहीत. त्यात युरोपातही मंदीचे सावट आहेच आणि अन्य महाकाय अर्थव्यवस्थांना देखील विविध आव्हानांनी घेरलेले आहे. अशा स्थितीत ६.५ टक्क्यांच्या विकासदराकडे झेपावू पाहणारा भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदारांना निश्चित आकर्षित करेल. देशांतर्गत मुद्यांचा वेध घ्यायचा तर, सध्या पायाभूत सुविधा, उद्योग, बांधकाम उद्योग, औषध निर्मिती, तेल व गॅस, सेवा क्षेत्र बँकिंग आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी होताना दिसेल. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात कार्यरत खासगी क्षेत्राने क्षमता विस्तारासाठी फारशी गुंतवणूक केलेली नाही. आगामी काही वर्षांत क्षमता विस्तार होताना दिसेल तसेच नवीन उत्पादन प्रकल्पांची उभारणी
होताना दिसेल. याचा स्वाभाविक फायदा भारताच्या विकासाला होईल.
नवीन किंवा नव्या पिढीचे व्यवसाय याला भक्कम भांडवलाचे पाठबळ लाभलेले आहे. तसेच ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्यात त्यांनी यापूर्वीच अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
हे सर्व सकारात्मक मुद्दे असले तरी काही प्रमाणात जोखीम निश्चित आहे. एक प्रमुख शक्यता म्हणजे अल्-निनोमुळे मान्सूनला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल असे अंदाज व्यक्त होत आहेत. तसेच काही बड्या भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांचे अपयश (लपविलेल्या कर्जामुळे किंवा लपविलेल्या वस्तुस्थितीमुळे); पण यामुळे बँकिंग उद्योगात शैथिल्य येऊ शकते आणि विकासाचा वेग मंदावू शकतो. वर नमूद केलेल्या काही गोष्टी वगळता आंतरराष्ट्रीय पातळीवर काही अस्थिरता वाढविणाऱ्या घडामोडी घडल्या नाहीत तर भारतीय बाजार उत्तम कामगिरी करेल असे वाटते. गेल्या १५ महिन्यांत लार्ज-कॅप, मिड-कॅप, स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांत २० ते ८० टक्क्यांपर्यंत करेक्शन झाले आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदाराला विश्वास काहीसा हलला आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी गेल्यावर्षीपासून भारतीय कंपन्यांना तितकेसे महत्त्व दिलेले नाही. अमेरिकी डॉलर अशक्त झाल्यामुळे आणि जागतिक अर्थकारणावर मंदीची सावली गडद होताना दिसते, पण त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग ६.५ टक्क्यांपर्यंत जाण्याच्या दिशेने असल्यामुळे यंदाच्या वर्षी भारतीय शेअर बाजारात पैसा येताना दिसेल. आधीच परकीय वित्तीय संस्थांनी भारतीय कंपन्यांच्या समभागाची विक्री केल्यामुळे त्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे, त्यात जर भारतीय गुंतवणूकदार सरसावले तर भारतीय शेअर बाजार निश्चित उत्तम कामगिरी करेल.