Join us  

चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 4:27 PM

चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. पण शपथविधी सोहळ्यापूर्वीच लक्ष्मीची कृपा झाली आहे. गेल्या १२ दिवसांत त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत १०५ टक्क्यांनी वाढ झाली.

चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. पण शपथविधी सोहळ्यापूर्वीच लक्ष्मीची कृपा झाली आहे. गेल्या १२ दिवसांत त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत १०५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे नायडू कुटुंबीयांच्या संपत्तीत १,२२५ कोटी रुपयांची वाढ झाली. सोमवारी बीएसईवर हेरिटेज फूड्सच्या शेअरनं पुन्हा एकदा १० टक्क्यांची उच्चांकी पातळी गाठली. यासह या शेअरनं ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठून ७२७.९ रुपयांचा टप्पा गाठला.  

दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे २३ मे रोजी शेअरची बंद किंमत ३५४.५ रुपये होती. त्यात ३ जूनपासून सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. नायडू यांच्या कुटुंबाचा कंपनीत ३५.७१ टक्के हिस्सा आहे. नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश हेरिटेज फूड्सचे प्रवर्तक आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीत त्यांची १०.८२ टक्के हिस्सा होता. कंपनीच्या अन्य प्रवर्तकांमध्ये नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी नारा आणि नातू देवांश नारा यांचा समावेश आहे. कंपनीत त्यांची अनुक्रमे २४.३७ टक्के आणि ०.०६ टक्के हिस्सेदारी आहे. नायडू यांची सून ब्राह्मणी यांचाही कंपनीत ०.४६ टक्के हिस्सा आहे.  

१० जून २०२४ पर्यंत हेरिटेज फूड्समध्ये भुवनेश्वरी नारा यांच्या शेअर्सची किंमत १६३१.६ कोटी रुपये आहे तर नारा लोकेश यांच्या शेअर्सची किंमत सुमारे ७२४.४ कोटी रुपये आहे. हेरिटेज फूड्समध्ये नायडू कुटुंबीयांच्या हिस्स्याचं मूल्य २,३९१ कोटी रुपये आहे. 

शेअर्समध्ये तेजी का? 

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून हेरिटेज फूड्सच्या शेअरमध्ये तेजी आहे. या निवडणुकीत तेलगू देसम आघाडीला १७५ पैकी १६५ जागा मिळाल्या होत्या. तेलुगू देसमची भाजप आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती आहे. हेरिटेज फूड्स ही देशातील अग्रगण्य व्हॅल्यू अॅडेड आणि ब्रँडेड डेअसी पदार्थ कंपन्यांपैकी एक आहे. त्याची उपकंपनी हेरिचेस न्यूट्रीवेट लिमिटेड चारा व्यवसायात आहे. हेरिटेज फूड्सचे डेअरी प्रोडक्ट ११ राज्यांतील १५ लाखांहून अधिक घरांमध्ये वापरले जातात. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात १७ टक्के तर नफ्यात ८३ टक्के वाढ झाली. या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये १२६ टक्के वाढ झाली आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारीची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :चंद्राबाबू नायडूशेअर बाजार