Join us  

BHEL Share Price : महारत्न कंपनीला मिळाली १३,३०० कोटींची ऑर्डर, ३०० रुपयांपार पोहोचला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:00 AM

शुक्रवारी कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ३०७.९५ रुपयांवर पोहोचला. मेगाऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे.

BHEL Share Price : महारत्न कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअर्समध्ये तेजी आली आहे. शुक्रवारी भेलचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ३०७.९५ रुपयांवर पोहोचला. मेगाऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला झारखंडमधील कोडरमा येथे १६०० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचं काम देण्यात आलं आहे. ही ऑर्डर १३,३०० कोटी रुपयांची आहे. यानंतर भेलचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ३२२.३५ रुपयांवर पोहोचला.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला (भेल) दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून  (DVC) ही ऑर्डर मिळाली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने  (DVC) कोडरमा थर्मल पॉवर स्टेशनच्या (२X८०० मेगावॉट) अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पॅकेजसाठी निविदा अंतिम केली आहे. भेलकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापित औष्णिक निर्मिती क्षमता सन २०३० पर्यंत ८१४० मेगावॅट होईल.

वर्षभरात २६० टक्क्यांपर्यंतची वाढ

गेल्या वर्षभरात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (भेल) शेअरमध्ये २६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २८ जून २०२३ रोजी भेलचा शेअर ८५.१७ रुपयांवर होता. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा शेअर २८ जून २०२४ रोजी ३०७.९५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत भेलच्या शेअरमध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या ६ महिन्यांत सरकारी कंपनीचे शेअर्स १९२.६० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांत भेलच्या शेअरमध्ये ५७० टक्क्यांची वाढ झाली. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ४५.५५ रुपयांवरून ३०७ रुपयांपर्यंत वाढले आहेत.

अदानी समूहाकडूनही ऑर्डर

महारत्न कंपनी भेलला नुकतीच अदानी समूहाकडून ७००० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर २ वीज प्रकल्पांसाठी आहे. पहिली ऑर्डर २*८०० मेगावॅट रायपूर सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटसाठी आहे. तर दुसरी ऑर्डर २*८०० मेगावॅट मिर्झापूर सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटसाठी आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक