Join us  

Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:16 PM

Yes Bank Share Price: येस बँकेसाठी मागील ५ दिवस चांगले राहिलेले नाहीत. या काळात खासगी बँकांच्या शेअर्सच्या किमती तब्बल ९ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत.

Yes Bank Share Price: येस बँकेसाठी मागील ५ दिवस चांगले राहिलेले नाहीत. या काळात खासगी बँकांच्या शेअर्सच्या किमती तब्बल ९ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. एनएसईमध्ये येस बँकेचा शेअर २१.५० रुपयांवरून १९.५० रुपयांवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये ही विक्री तिमाही निकालाच्या दबावामुळे दिसून येत आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी फ्लॅट राहणार असल्याचं मानलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते, बँकेच्या ठेवी फारशा चांगल्या नसल्यामुळे विकासदर मंदावण्याची शक्यता आहे.

येस बँकेची टार्गेट प्राइस किती?

"येस बँकेच्या शेअर्समध्ये काही सत्रांमध्ये विक्री होऊ शकते. जर तुमच्याकडे येस बँकेचे शेअर्स असतील तर ते ठेवण्याचा होल्ड करण्याचा सल्ला दिला जातो. स्टॉपलॉस १६.९० रुपये आहे. येत्या काळात हा शेअर २३ रुपयांवरून २४.८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया स्पार्क कॅपिटलचे एव्हीपी चंद्रकांत यांनी दिली.

बँकेची कामगिरी कशी होती?

पहिल्या तिमाहीत जाहीर झालेल्या निकालात कंपनीनं, निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ४६.४९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं म्हटलं. येस बँकेला एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत ५०२.४३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३४२.५२ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत येस बँकेचं उत्पन्न १७.५९ टक्क्यांनी वाढून ८९१८.१४ कोटी रुपये झाले आहे. जुलैमध्ये मूडीजनं रेटिंग स्टेबलवरुन वाढवून पॉझिटिव्ह केलं होतं. त्याचवेळी इक्रानं A निगेटिव्ह वरून A मध्ये बदललं होतं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :येस बँकशेअर बाजार