Join us  

HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह 'या' सेवाही वापरता येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 2:18 PM

HDFC Bank: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे.

HDFC Bank: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टमला नव्या इंजिनिअर्ड प्लॅटफॉर्मसह बदलत आहेत.

देशभरातील ९.३ कोटी ग्राहकांसह, बँक युझर्सचा अनुभव वाढविण्यासाठी नवीन इंजिनीअर्ड प्लॅटफॉर्मसह आपल्या कोअर बँकिंग प्रणालीत बदल करीत आहे. यामुळे बँकेच्या कामगिरीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. तसंच, हाय ट्रॅफिक व्हॉल्युम हाताळणं ग्राहकांची विश्वासार्हता आणि स्केलेबिलिटी वाढवेल.

काय होणार बदल?

या अपग्रेडनंतर, एचडीएफसी बँक साईज आणि बँकिंग व्हॉल्यूमच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बनेल, न्यू जनरेशन प्लॅटफॉर्मवर आपली कोर बँकिंग प्रणाली होस्ट करेल. १३ जुलै रोजी पहाटे ३ वाजता हे अपग्रेड सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता पूर्ण होणार आहे. १३.५ तासांच्या या कालावधीत ग्राहकांना काही सेवांचा लाभ घेता येणार नाही.

ग्राहक एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड (मर्यादित रकमेपर्यंत) किंवा क्रेडिट कार्ड वापरून कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतात. तर ग्राहकांना १२ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजताच्या बॅलन्सच्या आधारे बँक बॅलन्स दिसेल. दुकानांमध्ये स्वाइप मशिनवर ग्राहक एचडीएफसी बँकेचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकतात. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय ऑनलाइन शॉपिंग करू शकता.

या सेवा वापरता येणार नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी यूपीआय सेवा पहाटे ३.०० ते ३.४५ आणि सकाळी ९.३० ते दुपारी १२.४५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. संपूर्ण अपग्रेड कालावधीत नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवांचाही लाभ घेता येणार नाही. याशिवाय आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सह सर्व फंड ट्रान्सफर मोडदेखील अपग्रेड कालावधीत उपलब्ध नसतील.

काय म्हटलंय बँकेनं?

कोणताही अडथळा येऊ नये यासाठी बँकेनं १२ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजेपूर्वी पुरेशी रक्कम काढून पैसे ट्रान्सफर करण्यासारखी सर्व आवश्यक कामे करण्याचा सल्ला दिला आहे. ही गैरसोय कमी करण्यासाठी बँक शनिवार, १३ जुलै २०२४ रोजी हे काम करणार आहे. या दिवशी दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी, एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधा.

टॅग्स :एचडीएफसी