Join us  

सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 3:58 PM

कंपनीच्या शेअर्सनं १ फेब्रुवारी रोजी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विक्रमी उच्चांक गाठला.

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IRDEA) शेअर्सनं गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विक्रमी उच्चांक गाठला. बीएसईवर शेअर 5% वाढून 190.95 रुपयांवर उघडला. ही या शेअरची 52 आठवड्यांची नवी उच्चांकी पातळी आहे. कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा हेच कारण आहे. दरम्यान, 2024 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सौर योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.   

अर्थमंत्र्यांनी सांगितलं की ,अर्थसंकल्पात सौर रूफटॉप योजनेतून १ कोटी कुटुंबांना मोफत वीज मिळणार आहे. या लोकांना दरमहा 15 ते 18 हजार रुपयांचं उत्पन्नही मिळेल. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णयही घेण्यात आल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पानं विकसित भारताचा पाया रचला गेला आहे, असंही त्या म्हणाल्या. या कंपनीचे मार्केट कॅप 48,823.25 कोटी रुपये झाले.  

IREDA चा IPO 21 नोव्हेंबर 2023 रोजी उघडला होता आणि तो 23 नोव्हेंबरपर्यंत खुला होता. कंपनीच्या IPO ची किंमत 30-32 रुपयांदरम्यान होती. 29 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 50 रुपयांवर लिस्ट झाले होते. सध्याच्या किमतीनुसार हा शेअर आता 281% ने वाढला आहे.  

काय म्हटलंय ब्रोकरेजनं? 

जीसीएल ब्रोकिंग या स्टॉकवर बुलिश आहे आणि त्यांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जीसीएल ब्रोकिंगचे रिसर्च अॅनालिसिस्ट वैभव कौशिक यांनी अलीकडेच सांगितलं की, "राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूर्योदय योजना जाहीर केली होती. जी 1 कोटी घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांशी संबंधित आहे. यामुळे IREDA ला नक्कीच महसूल वाढवण्यास मदत होईल. येत्या काही महिन्यांत हा शेअर 240 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. गुंतवणूकदार त्यावर 139 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवू शकतात." 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारअर्थसंकल्प 2024