Hero Motors IPO : परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे शेअर बाजाराचा मूड बिघडला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आयपीओ बाजारावरही होऊ लागला आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटर्स (Hero Motors) कंपनी समूहाची ऑटो कंपोनेंट फर्म हीरो मोटर्स लिमिटेडनं कंपनीच्या आयपीओचा निर्णय आता रद्द केलाय. हीरो मोटर्स लिमिटेडनं शेअर बाजार नियामक सेबीकडे ९०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी दाखल केलेला ड्राफ्ट मागे घेतला आहे.
आयपीओमध्ये ५०० कोटींचा नवा इश्यू
हीरो मोटर्सने सेबीकडे दाखल केलेल्या प्रस्तावित आयपीओच्या ड्राफ्टनुसार, कंपनीनं ९०० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ५०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्या इश्यूद्वारे आणि ऑफर फॉर सेलद्वारे ४०० कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याची योजना आखली होती. कंपनीच्या प्रवर्तकांनी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनीतील आपला हिस्सा विकण्याची योजना आखली होती.
ऑफर फॉर सेलमध्ये ओपी मुंजाल होल्डिंग्स २५० कोटी रुपयांचे शेअर्स, भाग्योदय इन्व्हेस्टमेंट्स आणि हीरो सायकल्स ७५ कोटी रुपयांचे शेअर्स विकणार होते. हीरो मोटर्समध्ये प्रवर्तक ओपी मुंजाल होल्डिंग्सचा सर्वाधिक ७१.५५ टक्के हिस्सा आहे. भाग्योदय इन्व्हेस्टमेंटचा ६.२८ टक्के आणि हीरो सायकल्सचा २.०३ टक्के हिस्सा आहे. हीरो मोटर्समध्ये साऊथ एशिया ग्रोथ इन्व्हेस्ट एलएलसीचा १२.२७ टक्के हिस्सा आहे.
प्रस्ताव ५ ऑक्टोबरला मागे
हीरो मोटर्स लिमिटेडनं ऑगस्ट २०२४ मध्ये आयपीओ लाँच करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. आयपीओ मागे घेण्यामागचं कारणही कंपनीनं स्पष्ट केलंय. "हीरो मोटर्स लिमिटेडनं ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ड्राफ्ट पेपर मागे घेतला. ड्राफ्टनुसार, कंपनीच्या उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर प्रकल्पाच्या विस्तारासाठी उपकरणं खरेदी करण्याबरोबरच नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या पैशातून कर्जाची परतफेड करण्याचा कंपनीचा विचार होता," असं यात नमूद करण्यात आलंय.
बीएमडब्ल्यू, डुकाटीदेखील ग्राहक
हीरो मोटर्स लिमिटेड इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक अशा दोन्ही पॉवरट्रेनची निर्मिती करते. अमेरिका, युरोप, भारत आणि ASEAN OEM's त्यांचे ग्राहक आहेत. बीएमडब्ल्यू, डुकाटी, नायलो इंटरनॅशनल, फॉर्म्युला मोटरस्पोर्ट, हमिंगबर्ड ईव्ही, एचडब्ल्यूए या कंपन्या हीरो मोटर्सच्या ग्राहक आहेत. जागतिक ई-बाइक कंपन्यांसाठी सीव्हीटी तयार करणारी हीरो मोटर्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. कंपनीचे भारत, ब्रिटन आणि थायलंडमध्ये ६ उत्पादन प्रकल्प आहेत.