Suzlon Energy Latest Updates: एनर्जी क्षेत्रात असलेल्या सुझलॉन एनर्जी या कंपनीबाबत एक मोठं अपडेट येत आहे. त्याचा परिणाम आज म्हणजेच बुधवार ७ ऑगस्ट रोजी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सवर दिसून येतोय. रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्स प्रोव्हायडर सुझलॉन एनर्जीनं संजय घोडावत समूहाकडून (SGG) रेनॉम एनर्जी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमधील हिस्सा खरेदी करण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे.
सुझलॉन एनर्जीचा शेअर बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ४.५ टक्क्यांनी वधारला. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं सुझलॉनवर 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवलं असून त्यांचं टार्गेट प्राइस ७३.४ रुपये इतकं केलंय. मॉर्गन स्टॅनलीच्या नोटनुसार, रेनोमची सात राज्यांमध्ये उपस्थिती आहे आणि त्याला १४ वेगवेगळ्या मेकच्या टर्बाइनच्या देखभालीचा अनुभव आहे. सुझलॉनवर ५ एक्सपर्ट्सपैकी तीन जणांनी बाय रेटिंग दिलं आहे, तर दोन जणआंनी होल्ड रेटिंग दिलंय.
मंगळवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर २.४३ टक्क्यांनी घसरून ६६.२६ रुपयांवर बंद झाला. हा शेअर ६८.२१ रुपयांवर उघडला आणि बीएसईवर ७०.९० रुपयांच्या उच्चांकी आणि ६५.६६ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
७६ टक्के हिस्सा मिळवणार सुझलॉन
सुझलॉन एनर्जीच्या संचालक मंडळानं संजय घोडावत समूहाकडून रेनॉम एनर्जी सर्व्हिसेसमधील ७६ टक्के हिस्सा दोन टप्प्यात ६६० कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं. ईटी नाऊनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. पहिल्या टप्प्यात ४०० कोटी रुपयांना ५१ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात सुझलॉन पहिल्या हप्त्याच्या अधिग्रहणानंतर १८ महिन्यांच्या आत २६० कोटी रुपयांना अतिरिक्त २५ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. म्हणजेच कंपनी कंपनीतील ७६ टक्के हिस्सा ६६० कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याची माहिती समोर येतेय.
"या धोरणात्मक निर्णयामुळे रेनॉमला केवळ सुझलॉन समूहाबरोबर पुढे जाण्याची संधी मिळत नाही तर, एसजीजीला विमानवाहतूक, शिक्षण, ग्राहक उत्पादनं आणि रिटेलसारख्या कोअर वर्टिकलवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळत आहे," अशी प्रतिक्रिया घोडावत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणीक घोडावत यांनी दिली.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)