Join us

इराण-इस्रायल युद्धामुळे अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट! श्रीमंतांच्या यादीत नाव घसरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 10:08 AM

Mukesh Ambani-Gautam Adani Wealth: शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या प्रचंड घसरणीचा परिणाम भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीवर झाला आहे.

Iran-Israel War : इराण आणि इस्रायल तणावाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. एकीकडे कच्चे तेलाचे भाव झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजार गडगडत आहे. बुधवार आणि गुरुवार सलग २ दिवस सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. एकीकडे सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला होता, तर दुसरीकडे निफ्टी ५४६ अंकांनी घसरला होता. दरम्यान, मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि अदानी समूहाच्या कंपन्यांनाही याचा फटका सहन करावा लागला. परिणामी श्रीमंतांच्या यादीतील मुकेश अंबानी-गौतम अदानी यांच्या मानांकनावरही परिणाम झाला आहे. या दोन्ही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत किती घट झाली आहे.

सेन्सेक्स १७७० तर निफ्टी ५४६ अंकांनी घसरलागुरुवारी शेअर बाजारात मोठी त्सुनामी आली. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या स्थितीत मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. बीएसई सेन्सेक्स 995 अंकांनी घसरुन ८३,२७० च्या पातळीवर उघडला. तर बंद होताना तो १७६९.१९ अंकांच्या किंवा २.१० टक्क्यांच्या घसरणीसह ८२,४९७.१० च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे BSE चे मार्केट कॅप (BSE MCap Fall) रु. १० लाख कोटींहून अधिक कमी झाले. तर NSE निफ्टी ५४६.५६ अंकांनी किंवा २.१२ टक्क्यांनी घसरला आणि २५,२५० च्या पातळीवर बंद झाला.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घटगेल्या २ दिवसात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खूपच घसरले. रिलायन्सचे शेअर्स ३.९५% च्या घसरणीसह २८१३.९५ च्या पातळीवर बंद झाले. शेअर्सच्या नुकसानीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅपही १९.०५ लाख कोटी रुपयांवर घसरले. या घसरणीचा परिणाम मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्सच्या चेअरमनच्या नेट वर्थमध्ये गेल्या २४ तासांत ४.२९ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ३६००० कोटी रुपयांची घट झाली आहे.

श्रीमंताच्या यादीत नंबर घसरलाया आठवड्यात सलग दुसऱ्या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी ३ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली होती. मुकेश अंबानींच्या नेट वर्थमधील घसरणीचा परिणाम त्यांच्या रँकिंगवरही झाला आहे. तब्बल ३६ हजार कोटींची घट झाल्यानंतर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता १०७ अब्ज डॉलरवर आली आहे. या आकडेवारीसह, ते जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत २ स्थानांनी घसरले आहेत. आता श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे १४व्या क्रमांकावर आहेत.

गौतम अदानी यांनाही मोठा धक्कारिलायन्ससोबतच अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्सही शेअर बाजाराच्या त्सुनामीत वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. अदानी ग्रीन एनर्जी शेअर ४.०९% घसरला आणि १८०७.८० वर बंद झाला, तर अदानी पोर्टचा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरला आणि १४२६.०५ वर बंद झाला. स्टॉकमधील घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत २४६०० कोटी रुपयांची घट झालेली पाहायला मिळाली. आता अदानी यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलर्स झाली असून १४व्या स्थानावरून १७व्या स्थानावर घसरले आहेत.

टॅग्स :शेअर बाजारमुकेश अंबानीगौतम अदानीशेअर बाजार