राजपुताना बायोडिझेल लिमिटेड ही राजस्थानमधील फुलेरा येथील बायोडिझेल निर्मिती करणारी कंपनी आहे. याचा आयपीओ नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई सेगमेंटमध्ये येणार आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता त्याचा जीएमपी ५० टक्क्यांवर पोहोचला. आपण या आयपीओबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
काय आहे कंपनीचा प्लॅन?
राजपुताना बायोडिझेल लिमिटेड प्राथमिक बाजारातून २४.७० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू सेल असेल. याअंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचा प्राइस बँड १२५ ते १३० रुपये निश्चित करण्यात आलाय. गुंतवणूकदार २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत बोली लावू शकतात.
हा पैसा कुठे वापरला जाणार?
इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर आपल्या उपकंपनीला कर्ज देऊन सध्याच्या उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी करण्याचा कंपनीचा मानस आहे. याशिवाय आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी आपल्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही करणार आहे. या पैशांचा वापर अन्य काही सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठीही केला जाणार आहे.
काय करते कंपनी?
राजपुताना बायोडिझेल लिमिटेड बायो फ्युएल आणि त्यांचे बाय प्रोडक्ट्स जसं ग्लिसरीन आणि फॅटी अॅसिड सारख्या त्यांच्या उप-उत्पादनांची निर्मिती करते. कंपनीची मंजूर उत्पादन क्षमता ३० किलो लिटर प्रतिदिन (केएल/पीडी) आहे. त्याची स्थापित उत्पादन क्षमता २४ किलोलिटर प्रतिदिन (केएल/पीडी) आहे. म्हणजे त्याच्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर केला जात आहे.
बायो डिझेल, क्रूड ग्लिसरीन, कॉस्टिक पोटॅश फ्लेक्स, युज्ड कुकिंग ऑइल, अॅस्ट्रिड फॅटी अॅसिड, मिथेनॉल, सायट्रिक अॅसिड, रिफाइंड राईस ऑईल, क्रूड सनफ्लॉवर ऑइल, सोडियम मेथाक्साईड, आरबीडी पाम स्टायरिन आदींचा समावेश आहे.
GMP किती?
ग्रे मार्केटमध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता कंपनीचे शेअर १९५ रुपयांवर ट्रेड होत होते. जर याचा अपर प्राईज बँड म्हणजेच १३० रुपयांची टार्गेट प्राईज मानली तर गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांचा नफा मिळण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)