नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून टाटा समूह अनेकविध कंपन्यांचे अधिग्रहण करताना पाहायला मिळत आहे. यातच आता टाटा आणखी एका मोठ्या कंपनीला विकत घेत आहे. टाटा समूह लवकरच भारतात बाटलीबंद पाणी विकणारी दिग्गज कंपनी बिसलेरी (Bisleri) खरेदी करणार आहे. यासाठी त्या कंपनीसोबत कराराची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. अंदाजे ६ हजार ते ७ हजार कोटी रुपयांमध्ये हा करार होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र, बिसलेरी कंपनीच्या कराराविषयीची बातमी येताच गेल्या सलग सत्रात शेअरला अप्पर सर्किट लागत असून, शेअरमध्ये तब्बल ८१ टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ही कंपनी मेसर्स बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडची (BIPL) फ्रँचायझी आहे, जी पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या प्रदेशासाठी आणि मेसर्स BIPL च्या परवान्याअंतर्गत "बिसलेरी" या ट्रेड ब्रँड असलेल्या बाटलीबंद पेयजलचे उत्पादन आणि मार्केटिंग करते.
गेल्या सहा महिन्यात ११४ टक्क्यांहून अधिकचा परतावा
ओरिएंट बेव्हरेजेसच्या समभागांनी गेल्या सहा महिन्यांत ११४ टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेत मल्टीबॅगर परतावा दिला आहे, तर २०२२ मध्ये शेअर आतापर्यंत १२६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. १९७१ मध्ये या कंपनीने पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये प्रवेश केला आणि बिहारमध्ये सॉफ्ट ड्रिंक बॉटलिंग प्लांटची स्थापना करून व्यवसायात विविधता आणली आणि नंतर कंपनीचे नाव ओरिएंट बेव्हरेजेस लिमिटेड, असे बदलले गेले. कंपनीने पॅकेज्ड ड्रिंकिंगचा व्यवसाय आणखी वाढवला आहे. कंपनी पाणी आणि रिअल इस्टेट व्यवसाय देखील चालवत आहे.
दरम्यान, रमेश चौहान हे बिस्लेरी येथील 'पॅकेज वॉटर कंपनी'चे मालक आहेत. ४ लाख रुपयांना विकत घेतलेली कंपनी सध्या ६ ते ७ हजार कोटी रुपयांत विकली जाऊ शकते. सुमारे ५० वर्षांपूर्वी चौहान यांनी ही कंपनी खरेदी केली होती, पण तीच कंपनी आता टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकली जाणार असल्याचे वृत्त समोर आले. दुसरीकडे, किमतीच्या चढ-उत्तरांच्या संदर्भात कंपनीने स्पष्टीकरण देत म्हटले की, टाटा समूह बिस्लेरी हा बिझनेस ब्रँड विकत घेण्याच्या प्रक्रियेत आहे किंवा विकत घेतला आहे, अशी बातमी माध्यमात सुरु आहे. आमच्या शेअरच्या किंमतीतील चढ-उताराचे हे एक कारण असू शकते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"