शेअर बाजारात बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरने आपल्या गुंतवणूक दारांना छप्परफाड परतावा दिला आहे. हा शेअर अगदी १० महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत २९०० टक्यांनी वधारला आहे. या कंपनीचा शेअर १३ जूनला ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह, २३२०.८० रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये ही तेजी, कंपनीला एक मोठे काम मिळाल्याने आली आहे. बोंडाडा इंजीनिअरिंगला हे काम नवरत्न कंपनी एनएलसी इंडियाकडून मिळाले आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षात ऑगस्टमध्ये आला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७५ रुपये होती.
९३९ कोटी रुपयांचं आहे काम -
एनएलसी इंडियाने बोंडाडा इंजिनिअरिंगला ६०० मेगावॅट ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्टच्या बॅलेन्स ऑफ सिस्टिम (BOS) वर्कची ऑर्डर दिली आहे. या वर्क ऑर्डरमध्ये ३ वर्षांसाठी ऑपरेशन्स अँड मेंटेनेन्सच्या कामाचाही समावेश असेल. हा कॉन्ट्रॅक्ट ९३९.३९ कोटी रुपयांचा आहे.
बोंडाडा इंजिनिअरिंगला हा प्रोजेक्ट लेटर ऑफ अवॉर्ड (LOA) पासून १५ महिन्यांच्या आत पूर्ण करायचा आहे. याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात एनएलसी इंडियाने एका SOMW सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी बोंडाडा इंजिनिअरिंगला बॅलेन्स ऑफ सिस्टिम वर्कची ऑर्डर दिली होती. हे काम ८१.३४ कोटी रुपयांचे होते.
६ महिन्यांत ४७५% ची उसळी -
बोंडाडा इंजिनिअरिंगच्या (Bondada Engineering) शेअर्समध्ये सुरुवातीपासूनच जबरदस्त तेजी दिसत आहे. कंपनीचा शेअर ६ महिन्यांत ४७५ टक्क्यांनी वधारला. हा शेअर १३ डिसेंबर २०२३ रोजी ४०३ रुपयांवरहोता. तो १३ जून २०२४ रोजी २३२०.८० रुपयांवर पोहोचला. या वर्षात आतापर्यंत बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये जवळपास ४५७ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. कंपनीचा शेअर या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारीला ४१७.१० रुपयांवर होता. तो आता २३०० रुपयांच्याही पुढे गेला आहे.
(टीप येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)