Join us  

शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:00 PM

Sebi Share Market Research : सेबीच्या रिसर्चमधून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. पाहा काय म्हटलंय सेबीनं रिपोर्टमध्ये.

शेअर बाजारावर एआय बॉट्सचं राज्य असेल अशी वेळ आता दूर नाही. 'आर्थिक वर्ष २०२४ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्सनं मिळून सुमारे ५९,००० कोटी रुपयांचा नफा कमावला, ज्यात प्रमुख भूमिका अल्गोरिदम ट्रेडिंगची आहे. प्रोपरायटरी ट्रेडर्सनं अल्गोरिदमचा वापर करून सुमारे ३२,००० कोटी रुपयांचा नफा कमावला, तर एफआयआयनं अल्गोच्या माध्यमातून २६,९०० कोटी रुपयांचा नफा कमावला,' अशी माहिती सेबीच्या रिसर्चमधून समोर आली आहे.

"एफपीआय आणि प्रोपायटरी ट्रेडर्सचा बहुतांश नफा 'अल्गो संस्थांद्वारे' कमावला. एफपीआयचा ९७% आणि प्रोपरायटरी ट्रेडर्सचा ९६% नफा अल्गोरिदममधून आला. ३७६ एफआयआयमधून ३०६ नं अल्गोरिदमचा वापर केला. तर ६२६ प्रोपरायटरी ट्रेडर्सपैकी ३४७ नं याच प्रकारचा वापर केला. याउलट केवळ १३ टक्के रिटेल ट्रेडर्सनं अल्गोरिदमचा वापर केला," असंही सेबीच्या रिसर्चमध्ये समोर आलंय.

रिटेल ट्रेडर्ससाठी स्थिती ठीक नाही

मात्र, रिटेल ट्रेडर्ससाठी परिस्थिती चांगली नव्हती. अल्गोरिदमचा वापर करणाऱ्या रिटेल ट्रेडर्सना आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १३,९०० कोटी रुपयांचा तोटा झाला. तर रिटेल ट्रेडर्सचं एकूण ४१ हजार ५४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलीये. इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, "संस्थात्मक गुंतवणूकदार चांगला नफा कमावत असले तरी बहुतांश रिटेल ट्रेडर्स तोट्यात आहेत आणि हे दुर्दैवी आहे," अशी प्रतिक्रिया जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी दिली.

F&O Trading मध्ये तोटा

शेअर बाजारातील फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगकडे (F&O Trading) सामान्य गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होत आहे. सेबीच्या अहवालातून ही बाब समोर आली. रिसर्चनुसार, १० पैकी ९ जणांना फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागल्याची माहिती समोर आलीये.

रिसर्चनुसार, फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये ९३ टक्के गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२२ ते आर्थिक वर्ष २०२४ या ३ वर्षांत १.८ लाख कोटी रुपये गमावले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये, बाजार नियामकाने असाच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये ८९ टक्के इंडिव्हिज्युअल इक्विटी F&O ट्रेडर्सनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पैसे गमावले.

टॅग्स :सेबीशेअर बाजार