Join us

घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, बाय रेटिंगसह मोठं टार्गेट; कोणते आहेत हे शेअर्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 2:08 PM

सोमवारी आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सध्या शेअर बाजारात विक्रीचा दबाव असला तरी ब्रोकरेज काही शेअर्सला खरेदीचा सल्ला देत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स.

काही दिवसांपूर्वीच शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं विक्रमी पातळी गाठली होती. परंतु नंतर शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. येत्या २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या नव्या सरकारच्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे त्याला बाजार कसा प्रतिसाद देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दरम्यान, सोमवारी शेअर बाजारातील घसरणीतही ब्रोकरेज काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल लिमिडेटनं एल अँड टी फायनान्स, अदानी पोर्ट्स आणि एन्जल वनला खरेदीचा सल्ला दिला आहे. यासह त्यांनी या शेअर्सचं टार्गेट प्राईजही वाढवलंय.

एल अँड टी फायनान्स (L&T Finance) : एल अँड टीच्या शेअरला मोतीलाल ओस्वालनं २३० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. कंपनीनं प्रोसेस ऑटोमेशन, सुरक्षा आणि कस्टमर जर्नीमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये, कंपनीनं तिच्या किरकोळ रिटेल लोनमध्ये सातत्यानं मजबूत वाढ केली आहे. एटीएफनं स्वतःला किरकोळ फ्रँचायझी मध्ये रूपांतरित केले आहे, ज्यामुळे नफा सुधारेल आणि RoA चा विस्तार होईल, असं ब्रोकरेजनं म्हटलंय.

एन्जल वन (Angel One) : ब्रोकरेजनं एन्जल वनला ४२०० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. सध्या हा शेअर २३६० रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. एन्जेल वन १५ बिलियन रुपयांच्या उभारणीसह, क्लायंट अॅक्वेझेशन आणि एमटीएफ बूक सारख्या महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. ते आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करत आहेत, ज्यामध्ये पुढील २-३ वर्षांमध्ये वितरण महसुलात मजबूत वाढीसह अनेक बाबींचा समावेश असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलंय.

अदानी पोर्ट्स (Adani Ports) : अदानी पोर्ट्सचा शेअर १४७२ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. ब्रोकरेजनं १७०० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. वाढीसाठी कंपनीनं बंदरं आणि लॉजिस्टिक व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं सुरू ठेवलं आहे. ट्रान्सशिपमेंट हबमध्ये ऑपरेशन्स सुरू केल्यानं कंपनीला व्हॉल्यूम आणखी वाढवता येईल. आर्थिक वर्ष २०२४-२०२६ दरम्यान कार्गो व्हॉल्यूममध्ये ११ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, असं ब्रोकरेजनं म्हटलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक