शेअर बाजारात सोमवारीही तेजी कायम राहिली आणि निफ्टीनं पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीनं २४६३५ ची नवी उच्चांकी पातळी पाहिली. आज शेअर बाजारात मोठी गॅप अप ओपनिंग झाली आणि ती कायम राहिली. व्यवहाराअंती निफ्टी ८५ अंकांच्या वाढीसह २४५८७ च्या पातळीवर बंद झाला, तर सेन्सेक्स १४६ अंकांनी वधारून ८०६६५ च्या पातळीवर बंद झाला. या तेजीदरम्यान, ब्रोकरेज काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत.
ब्रोकरेज टीसीएस, अपोलो हॉस्पिटल आणि हिंदाल्कोवर बुलिश दिसून येत आहे. ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओस्वालनं टीसीएस, अपोलो हॉस्पिटल आणि हिंदाल्कोला बाय रेटिंग देत त्यांचं टार्गेट प्राईजही वाढवलं आहे. टीसीएसला त्यांनी ४६०० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं असून ते सध्याच्या किंमतीपेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. तर अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्ससाठी त्यांनी ७०७० रुपयांचं आणि हिंदाल्कोसाठी त्यांनी ८०० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं असून सध्याच्या किंमतीपेक्षा हे अनुक्रमे ११ आणि १६ टक्क्यांनी अधिक आहे.
टीसीएस - टीसीएसला ब्रोकरेज फर्मनं ४६०० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. साईज, ऑर्डर बुक आणि दीर्घ कालावधीच्या ऑर्डर्स, तसंच पोर्टफोलिओचा एक्सपोजर लक्षात घेता, टीसीएससाठी स्थिती चांगली आहे. स्थिर नेतृत्व बेस्ट-इन-क्लास एक्झिक्युशन यामुळे कंपनी आपलं इंडस्ट्री लिडिंग मार्जिन राखण्यास सक्षम आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ चांगलं असण्याची अपेक्षा असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलंय.
अपोलो हॉस्पिटल - ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालनं या शेअरला बाय रेटिंगसह ७०७० रुपयांचं टार्गेट दिलं आहे. अपोलो हेल्थकेअरमधील नुकसान कमी करून वार्षिक आधारावर EBITDA वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. खाटांची संख्या वाढवणं, नफा सुधारणं ऑफलाइन फार्मसीसाठी ५०० स्टोअर्स जोडणं, योग्य निदानांसाठी लॅब/कलेक्शन सेंटर जोडण्यासारख्या योजनांवर काम सुरू असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलं.
हिंदाल्को - हिंदाल्कोसाठी ब्रोकरेजनं ८०० रुपयांचं टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलं आहे. प्रीमिअम सेंगमेंट्स तसंच १२५ सीसीमध्ये नवे लाँच, स्कूटर, निर्यातीत वाढ यामुळे कंपनीचा CAGR आर्थिक वर्ष २०२४-२६ दरम्यान ९ टक्के राहिल अशी अपेक्षा आहे. मजबूत ब्रँड इक्विटी पाहता हळूहळू ग्रामीण रिकव्हरीचाही फायदा होईल. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये दुहेरी अंकात महसूलाची वाढ होईल, असंही त्यांनी नमूद केलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)