गुरुवारी कामकाजाच्या पाचव्या दिवशी शेअर बाजारात वाढ कायम राहिली आणि सेन्सेक्सनं ६६,००० चा टप्पा ओलांडला. त्याच वेळी, मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप या तेजीदरम्यान गुरुवारी ३१९.१० लाख कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं.
बीएसईचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स ३८५.०४ अंकांच्या किंवा ०.५८ टक्क्यांच्या वाढीसह ६६,२६५.५६ अंकांवर बंद झाला. कामकाजाच्या सलग पाचव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तेजीदरम्यान सेन्सेक्सनं एकूण १,४३४.१५ अंकांनी किंवा २.२१ टक्क्यांनी झेप घेतली आहे.
बीएसई लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप
या कालावधीत बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही ९.५० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यासह या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ३,१९,१०,०१९.०४ कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. बीएसईच्या मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांमध्येही तेजी आली आहे. गुरुवारी बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७९ टक्क्यांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांकात ०.४० टक्क्यांची वाढ झाली होती.